बांबू लावल्यावर ‘या’ परदेशी फळाची लागवड, एकनाथ शिंदे यांची शेती पाहिली का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावात आपल्या शेतात खास फळाची लागवड केली. हा प्रयोग स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आहे. शिंदे यांचे हे शेतीविषयक काम आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

बांबू लावल्यावर ‘या’ परदेशी फळाची लागवड, एकनाथ शिंदे यांची शेती पाहिली का?
हातात फावडे आणि झारी घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवाकाडोचे झाड लावले
Image Credit source: social media
| Updated on: Apr 21, 2025 | 10:04 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या नातवासोबत वृक्षारोपण केलं. तसेच ते शेतीतही रमल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील दरे गावातल्या शेतात यंदा मुख्यमंत्र्यांनी चक्क आवाकाडोची लागवड केली. हातात फावडं आणि झारी घेऊन शेतात उतरलेल्या एकनाथ शिंदेंचा अनोखा अंदाज यावेळी पहायला मिळाला असून त्यांचे शेतातले फोटोही बरेच व्हायरल झाले आहेत. खुद्द एकनाथ शिंदे यांनीही याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट लिहीत काही फोटो शेअर केले होते. त्यांच्या या शेतीकामाचीही बरीच चर्चा सुरू आहे.

शेतात केली आवाकाडोची लागवड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बऱ्याचदा साताऱ्यातील दरे गावी जात असतात. नुकतेच त्यांनी पुन्हा गावचा दौरा केला. दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला.

काल केलेल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या शेतात देखील हा प्रयोग केला.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात. त्यामुळे इथे केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री आहे. तसे झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लु-बेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखी एक पीक सापडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते.