माझा संकल्प आहे, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही : मुख्यमंत्री

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही हा माझा शब्द आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadnavis Aurangabad drought tour, माझा संकल्प आहे, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही : मुख्यमंत्री

औरंगाबाद सध्याच्या पिढीने मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा पाहिला आहे. पण पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत दिली. मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळी भागाची पाहणी करुन औरंगाबादेतील चारा छावणीला भेट दिली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही हा आमचा संकल्प आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाड्यातील सर्व गावं पाईपलाईनने जोडणार

आत्ताच्या पिढीने मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा पाहिला आहे. पण पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अंमलात आणली जात आहे. मराठवड्यातील सगळी धरणं जोडण्याचे काम सुरु आहे. राज्यातील 11 प्रमुख धरणे पाईप लाईनने जोडणार आहोत. मराठवड्यातील सगळी गावे पाईपने जोडली जाणार आहेत. त्यामुळे मराठवाडा दुष्काळ मुक्त होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

समुद्राला जाणारं पाणी अडवणार

मागच्या पाच वर्षात मोदींचं स्वच्छ भारत हे अभियान होतं. पण आता नवीन अभियान आलंय, ते आहे जलशक्ती अभियान. यातून देशात सगळीकडे पाणी पोहोचवलं जाणार आहे. समुद्राला वाहून जाणारे पाणी आम्ही गोदावरी पत्रात आणून सोडणार आहोत, सुरुवातीला 60 आणि नंतर 40 असं शंभर टीएमसी पाणी आम्ही गोदावरीत आणणार आहोत. हे पूर्ण झाल्यास मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दुष्काळी मदत
मुख्यमंत्री म्हणाले, “यावर्षी दुष्काळी अनुदान लवकर दिलं. लागतील तेवढ्या चारा छावण्या सुरु केल्या. यावर्षी केंद्र सरकारने 4 हजार 700 कोटी महाराष्ट्राला दुष्काळासाठी दिले.

विम्याच्या बाबत काही गावात तक्रारी आहेत.  आपली उत्पादकता कमी झाल्यामुळे पीकविमा मिळण्याच्या बाबतीत अडचणी येत आहेत. पण कुणालाही वंचित ठेवणार नाही. ज्यांना विम्याची मदत मिळाली नाही, त्यांना इतर कशा पद्धतीने मदत देता येईल याचा प्रयत्न सरकार करणार आहे” 

जलयुक्त शिवार
जर जलयुक्त शिवारची कामे झाली नसती, तर यावर्षी दुष्काळाची दाहकता जास्त असती.इतक्या भीषण दुष्काळातही, कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढली आहे. याला कारण जलयुक्त शिवार योजना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाऊस थोडा जरी पडला तरी पाणी साचत आहे. कारण जलयुक्त शिवारच्या कामामुळे यश मिळालं आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

वैरण विकास योजना

कापूस सोयाबीनमुळे चारा पिके बंद झाली. त्यामुळे गोवंशाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळेच दुधासारख्या शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर परिणाम झाला. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रमावर लक्ष दिलं जाणार आहे. हमीभाव दीडशे ते दोनशे टक्क्यांनी आपण वाढवला आहे.

शेतीमध्ये 5 पट जास्त गुंतवणूक आमच्या सरकारने केली आहे. ही गुंतवणूक आम्ही याही पुढे करत राहणार आहोत. शांतीलाल मुथा हा असा एक माणसातला दूत आहे की जिथे गरज पडेल तिथे जाऊन मदत सुरू करतात, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

खरीपचा मोसम सुरु होतोय. आम्ही सगळ्यांना सध्या sms पाठवत आहोत. sms पाहिल्याशिवाय पेरणी करू नका. पाऊस उशिरा येणार आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे लवकर पेरणी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे संकट ओढवून घेऊ नये. काय पेरायचं, कधी पेरायचं, कुठे पेरायचं हे आम्ही सांगत आहोत. खतांसाठी काही वर्षांपूर्वी रांगा लागायच्या, गोळीबार व्हायचा, पण आता खताचा साठा मुबलक प्रमाणात आहे. सध्या पडत असलेला पाऊस हा फसवा पाऊस आहे, त्यामुळे चारा छवण्यातून गुरं घेऊन जाण्याची घाई करु, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *