जर दोघांना राजकारणातून एक्झिट पाहिजे असेल तर मी…, मुंडे भाऊ- बहिणीच्या निवृत्तीच्या संकेतावर करुणा मुंडेंचं मोठं वक्तव्य
आधी पंकजा मुंडे आणि आता धनंजय मुंडे यांनी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे, राजकारणातून निवृत्त व्हावं वाटतं, असं पकंजा मुंडे यांनी रविवारी म्हटलं होतं, त्यावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं होतं. आता राजकारणातून निवृत्त व्हाव वाटतंय असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. गलिच्छ राजकारणात राहु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यामुळे आता मुंडे भाऊ- बहिणीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे, यावर करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
पंकजा मुंडे यांनी काल सांगितले की मला राजकारणातून एक्झिट पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी आज सकाळी सांगितलं की या गलिच्छ राजकारणामध्ये मी राहू की नाही. जर हा प्रश्न येतो आहे तर खरोखर या दोघा बहीण भावांनी राजकारणातून एक्झिट घ्यायला पाहिजे, आणि परळी बीडमध्ये मला संधी द्यायला पाहिजे, मी त्यांच्या एक्झिटसाठी बीडमध्ये सभा घेते, त्यांना पाठिंबा देते असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मी मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेल, मला आता राजकारणात यायला लोकांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. तुम्ही काय केलं? मराठ्याचा मर्डर झाला तुम्ही तिकडे सात्वनासाठी गेले नाही, मुस्लिमांचा मर्डर झाला तिकडे तुम्ही गेले नाही. वंजाऱ्याचा मर्डर झाला तुम्ही तिकडे जाता, कुटुंबाला पाच लाख रुपये देता, परंतु त्यांना देखील पूर्ण न्याय देऊ शकत नाही, एक अतिचा अंत असतो, त्यांचं आता अति झालं आहे, असा घणाघात यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे. या लोकांना गलिच्छ राजकारण केलं आहे, मुंडे साहेबांचं राजकारण या दोन्ही भाऊ बहिणींना जमलं नाही, असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.