
Maharashtra oath ceremony 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वात मोठ्या नाट्यमय घडामोडींपैकी एक म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या. मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला. यानंतर शिवसेना भाजपची युती तुटली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. मात्र यादरम्यान 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं होतं. अजित पवारांनी पहाटे गुपचूप शपथ घेतली आणि यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. हे सरकार फक्त 80 तास चालले. त्या शपथविधीवरून अनेकदा विविध गौप्यस्फोट होत असतात. आताही अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. यावेळी त्यांनी बीडमध्ये सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणासह पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला.
“2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. सुनील तटकरे याचे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मात्र मला मिळाली”, अशी खंत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.
“मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा इत्यादींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. पण आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणी मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडून मला टार्गेट केलं जातंय. याचेच जास्त वाईट वाटत आहे”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.