मोठी बातमी! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती, आमदाराच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ

Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान एका आमदाराने केले आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंची हत्या होणार होती, आमदाराच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ
dhananjay munde vs gutte
Image Credit source: TV 9 Marathi
Updated on: Dec 02, 2025 | 3:36 PM

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या या विधनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचा इंदोर मध्ये खून होणार होता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांच्यामुळे ते वाचले असं त्यांनी भाषणात म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी गंगाखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कडाडून टीका केली होती. आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांना केली होता. याला आता आमदार गुट्टे यांनी उत्तर दिले आहे.

आमदार गुट्टे यांचे मुंडेंना प्रत्युत्तर

गंगाखेडमधील भाषणात बोलताना आमदार गुट्टे यांनी म्हटले की, ‘तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, की मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनू भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.

गुट्टे यांना मुंडेंना सवाल

पुढे बोलताना आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की, ‘धनू भाऊ मागील काही वर्षात तुमच्यावर बरेच आरोप झाले, प्रत्येकजण तुमच्या विरोधात बोलत होता. पण मी कधीच तुमच्या विरोधात एकही शब्द काढला नाही पण तुम्ही आता स्वतःहून गंगाखेडला आलात आणि माझ्या विरोधात बोललात त्यामुळे आता मी तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सर्वच बाहेर काढणार आहे. जगमित्र साखर कारखान्यासाठी तुम्ही शेअर्सच्या रूपाने गोळा केलेले पैसे काय केले तुम्ही देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या असे म्हणत रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.

धनंजय मुंडेंची हत्या होणार होती

पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. रत्नाकर गुट्टे यांनी, ‘धनंजय मुंडे तुमचा इंदोर मध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे पण मी सगळेच आता काढणार नाही’ असं म्हटलं आहे. आमदार गुट्टे यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

गंगाखेड साखर कारखान्यासाठी कारखान्याने 106 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते आणि ते कर्ज देखील कारखान्याने फेडले आहे. गंगाखेड शुगर हा कारखाना विक्री झालेला आहे शेतकऱ्यांच्या नावावर कसल्याही प्रकारचा कर्ज कारखान्याने शिल्लक ठेवलं नाही. शेतकऱ्यांच्या नावावर जर कर्ज राहिला असेल तर आत्ता रत्नाकर गुट्टे हा राजकारणातून संन्यास घेईल.

काही शेतकऱ्यांच्या सिबिल चा प्रॉब्लेम झाला आहे, त्यासाठी देखील मी त्या शेतकऱ्यांना कोर्टामध्ये पाठवला आहे त्यांचे सिबिल देखील क्लिअर करण्याचं काम मी करणार आहे. धनु भाऊ हे जर खर असेल तर मग तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार का तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणार का? असा सवाल देखील यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केला आहे.