भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; बड्या नेत्याला डावललं, नव्या वादाला तोंड फुटलं
भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आलीय. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा बड्या नेत्याला डावललं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि विधानपरिषद आमदार बसवराज पाटील यांच्या गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवरून राणाजगजितसिंह पाटील यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर आता उमरगा येथे शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या बॅनरवरही राणाजगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याचे समोर आलंय. विशेष म्हणजे, बॅनरवर भाजपच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोटो असताना राणा पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काही महिन्यांपूर्वी धाराशिव-लातूर-बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार बसवराज पाटील निवडून आले होते. त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात भाजपमधील मतभेद उघड झाले होते. या कार्यक्रमाच्या स्वागत पत्रिकेवरूनच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ओमराजे निबांळकर यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर एका महिन्याने पुन्हा भाजपमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. उमरगा येथे आयोजित मुख्यमंत्री आरोग्य शिबाराच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो नव्हता. या बॅनरवर भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले. परंतु राणाजगजितसिंह पाटील यांचा फोटो नव्हता. पक्षाच्या बॅनरवरून राणाजगजितसिंह पाटील यांचा फोटो डावलल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
महिन्याभरापूर्वी वादाला कुठून सुरुवात झाली?
एका महिन्याआधी भाजप नेते व्यंकटराव गुंड यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जनसंघ काळापासून पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या जुन्या भाजप कार्यकर्त्याची अॅलर्जी असल्याची टीका केली होती. तसेच ते जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना टाळतात, असा आरोप केला होता. परंतु आम्ही त्यांना टाळतोय, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याचाही आरोप केला होता. त्यांनी पक्षातील नाराजी पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली, अशी माहिती व्यंकटराव गुंड यांनी दिली होती. मात्र, मनात नाराजी असल्याचे स्पष्ट केले होते. आता महिनाभरानंतर पुन्हा भाजपमधील अंतर्गत नाराजीनाट्य समोर आलं आहे.