Dharashiv Fire : धाराशिवमध्ये एका घराला लागली भीषण आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Dharashiv Fire : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिवाळीचा काल पहिला दिवस होता लक्ष्मी पूजनाचा. या पहिल्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात सर्वात दुर्देवी घटना धाराशिवमध्ये घडली आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सहाजणांचा मृत्यू झाला. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये करंडे यांचे आई-वडील, दोन मुली आणि पती-पत्नीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहाटे 4.20 वाजता घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कळंब आणि तुळजापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या.
रात्री 2.30 च्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकलेलं नाही. पण आग खूप भीषण होती. ज्या ठिकाणी ही दुर्देवी घटना घडली, तिथे आस-पास कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे आग विझवण्यासाठी वेळ लागला. कळंब आणि तुळजापूर येथून अग्निशमन दलाचे बंब बोलवावे लागले. आता ही आग विझली आहे. पण पहाटे 4.30 ते 5 वाजेपर्यंत गोविंद करंडे यांचं घर आगीमध्ये धगधगत होतं.
आगीची घटना घडली, त्यावेळी सर्वजण झोपेत होते, त्यामुळे कोणालाच प्राण वाचवण्याची संधी मिळाली नाही. या घरातील एक मुलगा बाहेर आल्याने तो या आगीतूु बचावला.
(बातमी अपडेट होत आहे)