Archana Patil : अर्चना पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाल्या ‘माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल’
पालकमंत्री यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासाला मदत होईल. ३० लाख रुपये मंदिर विकासासाठी जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकासनिधीतून देण्यात येईल.येथील मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.साडेपाच कोटी रुपये लोकवर्गणीतून ग्रामस्थानी देवस्थान विकासासाठी दिले आहे ही अभिमानाची बाब असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितलं.

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दच्या महादेव मंदिर भूमिपूजनावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. ‘पिंपळा खुर्दच्या शंभू महादेवाचं दर्शन घेतलं की राज्याचा मुख्यमंत्री होतो’ असं अर्चना पाटील म्हणाल्या. ‘माझ्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राग येईल’ असंही अर्चना पाटील म्हणाल्या. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महादेव मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पाडला. अर्चना पाटील यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिश्कील टोला लगावला. “मला मुख्यमंत्री वगैरे व्हायचं नाही, तुळजाभवानी मातेच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, हेच माझं भाग्य” असं प्रताप सरनाईक म्हणाले. अर्चना पाटील यांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय संकेत काय? यावर आता धाराशिव जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे.
धार्मिक,ऐतिहासिक वारशाचे जतन करून पिंपळा खुर्दच्या विकासाला गती देणार असं पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. पिंपळा (खुर्द) येथील शंभू महादेव देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन झाले. “धाराशिव जिल्ह्याच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.पिंपळा खुर्द येथील श्री शंभू महादेव मंदिराला भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात,भाविकांची गैरसोय होऊ नये आणि या देवस्थानाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी,यासाठी आवश्यक ते सहकार्य करू” अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
कोण-कोण उपस्थित?
आज तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दपिंपळा (खुर्द) ता.तुळजापूर येथील शंभू महादेव देवस्थान पिंपळा खुर्द येथील देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन सरनाईक यांच्या हस्ते झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सुमारे 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत
पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,”सुमारे 2 हजार वर्षांची ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या श्री शंभू महादेव मंदिराला हेमाडपंथी स्थापत्यकलेचा वारसा लाभला आहे.या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिराचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे” “स्वयंभू व जागृत शिवलिंगाच्या दर्शनासाठी धाराशिवसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक येतात. महाशिवरात्र,कावड मिरवणूक, छबिना,शिवकथा,भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह,दिंडी सोहळे,महाप्रसाद तसेच दररोज हरिपाठ-भजन अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे हे मंदिर भक्ती,अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र बनले आहे” असे त्यांनी सांगितले.