बाळासाहेबांच्या शिवसेनेत तीन तिघाडा काम बिघाडा, पक्षाच्या तीन नेत्यांमध्ये काय चाललंय ?

| Updated on: Nov 21, 2022 | 4:55 PM

शिंदे गटाची नाशिकमधील स्थिती बघता दादा भुसे, सुहास कांदे आणि हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त दूसरा मोठा नेता कोणीही नाही, पक्ष वाढवितांनाही मोठे पदाधिकारी कोणीही गळाला लागलेले नाहीत.

बाळासाहेबांच्या शिवसेनेत तीन तिघाडा काम बिघाडा, पक्षाच्या तीन नेत्यांमध्ये काय चाललंय ?
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : बाळसाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेत नाशिकमध्ये तीन प्रमुख नेते आहेत, त्यांच्या भोवतीच शिंदे गटाचा प्रवास सुरू आहे. मात्र, तिन्हीही नेत्यांमध्ये मतभेद असल्याने प्रत्येक जण आपली ताकद दाखविण्यासाठी ढाल-तलवार घेऊन मैदानात उतरण्यास सज्ज आहे. शिंदे गटाची नाशिकमधील स्थिती बघता दादा भुसे, सुहास कांदे आणि हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त दूसरा मोठा नेता कोणीही नाही, पक्ष वाढवितांनाही मोठे पदाधिकारी कोणीही गळाला लागलेले नाहीत. त्यामुळे नाशिकयामध्ये बाळसाहेबांची शिवसेना कधी आणि कशी वाढणार असा प्रश्न असतांनाच तिन्ही नेत्यांमधील धुसफूस चर्चा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हे तिन्हीही नेते शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे नेते नाहीत. तिन्हीही पूर्वी वेगळ्या पक्षाचे असल्याने नाराजीची वाढती दरी भविष्यात धोक्याची घंटा बनू शकते.

शिंदे गटाचे आमदार दादा भुसे हे पूर्वी जाणता राजा ही संघटना होती, त्यात प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन अपक्ष आमदार म्हणून भुसे निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता.

सलग चार वेळा निवडून आलेल्या दादा भुसे यांनाही जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी अद्याप पर्यन्त आपली ताकद लावता आलेली नाही, त्यामुळे भुसे यांनी गेल्या चार महिन्यात पक्षासाठी ठोस काय केलं हा देखील प्रश्नच आहे.

तर दुसरीकडे हेमंत गोडसे शिवसेनेचे खासदार झाले असले तरी पूर्वीचे ते मनसेत होते, सलग दोन वेळा निवडून येऊनही शहरात पक्षाची ताकद वाढवता आली नाही,

सलग दोनदा विजय मिळवलेल्या खासदारांना पक्षासाठी आपली ताकद वापरुन ठाकरे गटाच्या शिवसेना भिडता येत नसून पक्ष बळकट करतांना गोडसेही यशस्वी झालेले नाहीत.

तर सुहास कांदे हे देखील मूळचे शिवसैनिक नाही, मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास करून ते शिंदे गटात दाखल झाले आहे, वेळ प्रसंगी ते न्यायालयात जाण्यासाठी देखील मागेपुढे पाहत नसल्याने कांदे यांच्याबद्दल भुसे आणि गोडसे लांबच आहे.

सुहास कांदे वेळप्रसंगी कोणत्याही थराला जाऊ शकतील अशी स्थिती असल्याने कांदे यांची भूमिका इतर दोन्ही नेत्यांना त्रासदायक ठरत असली तरी शिंदे यांचे विश्वासू म्हणून कांदे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे शिंदे यांना वेळीच तिन्ही प्रकारच्या नेत्यांना एकत्र आणण्याची किमया करावी लागेल, नाराजीचे नारळ फुटत असतांनाच हे तीन नेते तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती करू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे पुढील महिन्यात शिंदे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने तिन्हीही नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत असून शिंदे हे मध्यस्थी करणार असून त्यात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.