Explainer : आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत, कलानगरात काय घडलं? वाचा A टू Z
आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस का देण्यात आली, असाही प्रश्न विचारला जात आहे. या नोटिशीचा संबंध आदित्य ठाकरे यांचे एक ट्वीट आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा दाखला दिला, तसंच आदित्य ठाकरेंच्या माणसांनी आमच्या वकिलांना धमकी दिली असा आरोपही त्यांनी केला.

दिनेश दुखंडे, निवृत्ती बाबर, कृष्णा सोनारवाडकर TV9 मराठी, मुंबई : सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने चालू केला आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी माझ्या मुलीची हत्या झाली आहे, माझ्या मुलीवर बलात्कार झाला, असा जबाब नोंदवला. सोबतच, माजी मंत्री आदित्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तसेच अन्य बड्या व्यक्तींचे नाव सतीश सालियान यांनी घेतलेले आहे. सतीश सालियान यांच्या जबाबानंतर सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात मात्र सीबीआयने कोणाचेही नाव घेतलेले नसून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही, मी त्यांना ओळखत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यांच्या याच स्पष्टीकरणानंतर नवा वाद रंगला आहे. सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस दिली आहे. ही नोटीस देण्यासाठी खुद्द सतीश सालियान मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्यांना रोखण्यात आले. सतीश सालियान नोटीस देण्यासाठी आल्यानंतर काय घडले? त्यांनी दिलेली नोटीस आदित्य ठाकरेंनी घेतली का? या प्रकरणात आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कलानगर भागात पोलिसांचा मोठा ताफा
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आरोप केल्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियान मातोश्रीच्या परिसरात आले. यावेळी काही काळासाठी ड्रामा रंगला. सतीश सालियान हे अब्रुनुकसानीची 500 कोटी रुपयांची नोटीस घेऊन त्यांचे वकील निलेश ओझा यांच्यासोबत मातोश्रीवर येण्याच्या प्रयत्नात होते. परंतु कलानगर भागात पोलिसांचा मोठा ताफा होता. या भागात शिवसैनिकही जमा झाले होते. दिशाचे वडील कलानगरच्या गेटपर्यंत येताच गेट बंद करण्यात आला आणि आदित्य ठाकरेंच्या वतीने त्यांच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली.
आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस का देण्यात आली, असाही प्रश्न विचारला जात आहे. या नोटिशीचा संबंध आदित्य ठाकरे यांचे एक ट्वीट आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा दाखला दिला, तसंच आदित्य ठाकरेंच्या माणसांनी आमच्या वकिलांना धमकी दिली असा आरोपही त्यांनी केला. “मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने, काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे, असं आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
वकील निलेश ओझांसोबत सतीश सालियान नोटीस घेऊन मातोश्रीच्या परिसरात आले. मुख्य गेटपर्यंत येण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळं दुसरे वकील नोटीस देण्यासाठी पुढे आले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रे यांनी निलेश ओझांनाच कसा कोर्टाच्या अवमान प्रकरणात 3 महिन्यांची शिक्षा झालेली आहे, याचा पाढा वाचला.
नेतेमंडळींची भूमिका काय?
हे प्रकरण घडल्यानंतर राजकारण पेटले. संजय राऊतांनी पुन्हा एकदा नितेश राणेंवर हल्लाबोल केला. कणकवलीत 20 वर्षात जेवढे खून झाले, ते खून पचवण्यासाठीही राणेंना सत्तेची गरज लागले, असा हल्लाबोल राऊतांनी केला. गोवेकर, अंकुश राणे, भिसेंचा हत्येचं राणेंच्या हातालाच रक्त लागलेले आहे. यांनाच अटक करा, अशी मागणी राऊतांनी केला. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जेवढं तोडं उघडाल तेवढा तुमच्या मालकाचा मुलगा अडचणीत येईल, असा इशारा नितेश राणेंनी दिला. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. आधीच कोणाला आरोपी ठरवू नये, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंनी नोटीस स्वीकारली आहे. यानंतर ते आता कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.