Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या पोस्टमुळे नवीन वाद, दिशा सालियनच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय, ते थेट मातोश्रीवर..
आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याचं दिशा सालियनच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जाऊन ही नोटीस देणार असं म्हटलं आहे. याबद्दलची माहिती वकिलांनी दिली आहे.

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी, मुंबई : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याची सतीश सालियन यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी 16 तारखेला केलेल्या सोशल मीडीया पोस्ट विरोधात नोटीस देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी योग्य ती सुरक्षा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. सतीश सालियन वकिलांसोबत स्वतः जाऊन 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस देणार अशी त्यांच्या वकिलांनी माहिती दिली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. परंतू आज आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून स्पष्ट केलं की मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही. त्यांनी माझी दिशाशी ओळखही नव्हती असंही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपलं चारित्र्यहनन करण्यासाठी राजकीय हेतून हे आरोप केले जात असल्याचे आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या पोस्टविरोधात त्यांना 500 कोटींची नोटीस देण्याची भूमिका दिशाच्या वडिलांनी वकिलांच्या माध्यमातून जाहीर केली आहे.
आदित्य ठाकरेंची पोस्ट जशास तशी
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!