युती आणि आघाडीत प्रमुख पक्षांमध्येच वाद, मित्रपक्षांचं काय होणार?
लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक छोट्या पक्षांना सोबत घेतलं आहे. महाराष्ट्रात देखील हेच चित्र आहे. पण छोट्या पक्षांना सोबत घेत असताना प्रमुख पक्षांवर मात्र छोट्या पक्षांचं काहीही दबावतंत्र यावेळी पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे मोठ्या पक्षांमध्येच जागावाटपावरुन रस्सीखेच असताना छोटे पक्ष बाजुला पडले आहेत.
Loksabha election : जागांवरुन प्रमुख पक्षांमध्येच वाद वाढल्यामुळे यंदा मित्रपक्षांचं दबावतंत्र फारसं कामी न आल्याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांना मविआचा पाठिंबा मिळण्याची आशा होती, पण ती सुद्धा आता मावळली. तर दुसरीकडे महायुतीत जानकरांना परभणीची जागा मिळाली आहे. यंदा तिकीटाच्या शर्यतीत मोठ्या पक्षांमधल्याच स्पर्धेनं मित्रपक्षांचे प्रस्ताव मागे पडले आहेत. सुरुवातीला राजू शेट्टी स्वतंत्र लढण्याची चर्चा होती. नंतर ठाकरेंसोबत त्यांच्या भेटी झाल्या. आधी मविआनं शेट्टींना पाठिंबा दिल्याची बातमी आली. मात्र तुम्ही पाठिंबा द्या, पण आपण मविआत येणार नसल्याची भूमिका शेट्टींनी घेतली. नंतर ठाकरेंनी शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. शेट्टींनी त्याला नकार दिल्यानं ठाकरेंनी सत्यजित पाटलांना हातकणंगलेमधून उमेदवारी दिली.
सदाभाऊ खोतही नरमले
दुसरीकडे महायुतीकडून हातकणंगलेत तिकीटाची मागणी करणारे सदाभाऊ खोतही नंतर नरमले. महादेव जानकरांनी शरद पवारांना भेटून पाठिंबा देण्याची विचारणा केली होती. मात्र अचानक त्यांनी महायुतीत असल्याचं सांगत परभणीतून अर्ज भरला. त्यामुळे गेल्या काही काळातल्या जानकरांच्याही भूमिकाही चर्चेत आल्या.
जानकरांना सुटलेल्या एका जागेवर जर आपणही शरद पवारांना भेटून दबावतंत्र आणलं असतं., तर कदाचित जागा सुटली असती. असा मिश्किल टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.
नवनीत राणांपुढे आव्हान
महायुतीचा दुसरा मित्रपक्ष आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमानी मित्रपक्ष आहे. मात्र अमरावतीच्या जागेसाठी त्यांच्या पत्नी नवनीत राणांना त्यांचाच पक्ष सोडून भाजपात प्रवेश करावा लागला. आणि दुसरे मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहारनं राणांविरोधात उमेदवार दिला.
म्हणजे रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक आहे. पण त्यांच्या पत्नी नवनीत राणांना भाजप प्रवेशानंतर उमेदवारी दिली गेली. दुसरीकडे बच्चू कडूंचा प्रहारही महायुतीचाच भाग आहे. पण भाजपच्या राणांना विरोध म्हणून त्यांनी अमरावतीत स्वतंत्र उमेदवार दिला.
मनसेची भूमिका गुलदस्त्यात
राज ठाकरेंच्या मनसेचं नेमकं काय ठरलंय., हे येत्या ९ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट होणार आहे. मात्र युतीच्या अधिकृत घोषणेआधीच नवनीत राणांनी त्यांच्या पोस्टरवर राज ठाकरेंना फोटो लावून चर्चांना तोंड फोडलं आहे. त्यावर मनसेचे नेते वा प्रवक्ते बोलण्यास तयार नाहीत.
तूर्तास हातकणंगलेत ठाकरेंनी उमेदवार दिल्यानं लढत रंजक होण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील असा सामना होऊ शकतो.
२०१९ ला काय होतं चित्र
हातकणंगले लोकसभेत शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या ६ विधानसभा येतात. 2019 ला महायुतीचे धैर्यशील माने विरुद्ध आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानीचे राजू शेट्टींमध्ये सामना झाला होता. मानेंना 5 लाख 85 हजार 776 मते तर राजू शेट्टींना 4 लाख 89 हजार 737 मतं पडली होती. मानेंचा विजय झाला. राजू शेट्टी 96 हजार 39 मतांनी पराभूत झाले. यात वंचित आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी घेतलेली 1 लाख 23 हजार मतं निर्णायक ठरली होती.