
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महायुतीमध्ये आता नाराजी नाट्य पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटातील काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावरून शिवसेना शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली असून, शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले नरेश मस्के?
महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार झालेली आहे, ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडले त्यांचा पराभव करण्यासाठी महायुती तयार झाली आहे. परंतु आता काही ठिकाणी असं होतंय की महाविकास आघाडीमधील लोकांना विरोध न करता महायुतीमधीलच घटक पक्षांचे नगरसेवक फोडण्याच्या मागे लागले आहेत. अंबरनाथमधील आमचा नगरसेवक असेल पालघर मधील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, त्यांना फोडून आपल्या पक्षात घेतलं जातंय हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी आमचा महायुतीतील मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाने उलट आम्हाला समजून घेतला पाहिजे, परंतु आमच्याच पक्षातील नगरसेवक गळाला लावणे, त्यांना पक्षात घेणे हे काही योग्य नाही, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा हा प्रकार आहे, असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.
राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर गल्लीबोळातल्या राजकारणामध्ये नेत्यांनी पडू नये, महायुती आपल्याला भक्कम ठेवायला पाहिजे. विरोधकांशी दोन हात आपण करूया, मात्र विरोधकांशी दोन हात न करता आपल्याच महायुतीतील मित्र पक्षांचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे चुकीचं आहे, अशा शब्दात नरेश मस्के यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून एकत्र येऊन दुसऱ्यांशी लढायचं ठरवलेलं आहे, विरोधकांशी आपण लढूया. महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे, एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची जी प्रथा सुरू आहे, ती चुकीची आहे. एकमेकांसोबत लढायचं तर लढूया, जरी आपण स्वबळावर लढलो तरी आपल्या मित्र पक्षावर टीका करायची नाही, परंतु एकमेकांचे माणसं फोडणे हे चुकीचं आहे, असंही यावेळी मस्के यांनी म्हटलं आहे.