KDMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! 21 हजारांचा बोनस जाहीर, आशा वर्कर्सनाही मोठं गिफ्ट
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी केडीएमसी कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये, तर आशा वर्कर्सना ६ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी ही घोषणा केली असून, दिवाळीपूर्वीच हा बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गणपती येऊन गेले, दसराही नुकताच पार पडला. आता सर्वांना वेध लागलेत ते दिवाळीचे… सणाचा उत्साह हळूहळू दिसू लागला असून कंदाल, माळा, पणत्या, फटाके यांच्या दुकानात गर्दी होऊ लागली आहे. घराघरांतून दिवाळीच्या फराळाची देखील तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर दिव्यांणा, रोषणाईचा हा सण आता आला असून याच दरम्यान KDMC कर्मचाऱ्यांचासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्सची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपये, तर आशा वर्कर्सना 6 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बोनस दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी दिली आहे.
महापालिका कर्मचारी आणि आशा वर्कर्सना मागील वर्षाच्या तुलनेत यंदावाढीव बोनस मिळावा, अशी मागणी म्युन्सिपल कर्मचारी सेना आणि परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीसंदर्भात आज महापौरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला केडीएमसी आयुक्त, संबंधित अधिकारी तसेच म्युनिसिपल कर्मचारी सेना आणि परिवहन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बोनस देण्याचा निर्णय जाहीर
या बैठकीत महापालिका कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपये आणि आशा वर्कर्सना 6 हजार रुपये बोनस देण्यावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी सांगितलं की,’मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या रकमेत एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपये बोनस मिळणार आहे. एवढंच नव्हे तर आशा वर्कर्सनाही 6 हजार रुपये बोनस दिला जाणार असून, दिवाळीपूर्वीच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे’ असं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन बासरे यांनीही बोनससंदर्भात झालेल्या बैठकीची माहिती दिली. महापालिका प्रशासनाने यंदा दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितल. यंदा दिवाळी लवकर येत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि बोनस एकाच वेळी मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका कर्मचाऱ्यांना वाढीव बोनस मिळणार असल्याने एकंदरच कर्मचारी वर्गात समाधानाचं, आनंदाचं वातावरण आहे.