जनावरांचं मलमूत्र खाऊन त्यांनी…विद्यानंद बापट प्रचंड भडकले, पुण्याच्या मिरवणुकीतील AI व्हिडीओ पाहताच संताप!
Vidyanand Bapat On Pune Ganesh Visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटावरून वाद निर्माण झाला आहे. यावर आता विद्यानंद बापटांनी प्रशासनाला सवाल केला आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणुका अधिक काळ सुरू राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. तब्बल ३२ तास उलटूनही काही ठिकाणी मिरवणुका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या कानात प्रोटेक्शन हेडफोन असल्याचे दृश्यही चर्चेत आले. तर यावर विद्यानंद बापट यांनी संताप व्यक्त केला आहे.
मिरवणुकीतील एका स्क्रिनवर विद्यानंद बापट यांचा एआय व्हिडिओ दाखवण्यात आल्याने हा मुद्दा आणखी चर्चेत आला. त्यावर बापट यांनी प्रतिक्रिया देत प्रशासनाच्या परवानगी देण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. परंपरेच्या नावाखाली कुणीही कोणतीही परवानगी मागितली, तर ती देण्याआधी विचार करायला हवा. परंपरा म्हणून कुणी सती प्रथा किंवा बालविवाहाची परवानगी मागितली, तर ती देता येईल का? नाही. कारण त्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते, असे बापट म्हणाले आहेत.
विद्यानंद बापट म्हणाले की, रहदारीच्या रस्त्यावरून मिरवणुका काढणे आणि खुल्या वातावरणात मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी देताना प्रशासनानेच या बाबींचा विचार करायला हवा होता. परवानग्या वाटतानाच विचार केला पाहिजे. त्यानंतर विश्लेषण करून काही फायदा नाही. पुण्यात डीजेच्या आवाजाबाबत अपेक्षित फरक पडलेला नाही, असे सांगताना बापट यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही टीका केली. त्यांच्या मते, रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत शांतता असते, मात्र ही शांतता केवळ काही तासांपुरती मर्यादित न राहता २४ तास असावी.
ते पुढे म्हणाले की, पुण्यात डीजेबाबत काही फरक पडला नाही. कारण हे झोंबी आहेत.लातो के भूत बातो से नही मानते. ते लोक जनावरांचं मलममूत्र खाऊन माजले आहेत. ह्या देवभोळ्यांना बोलून फायदा नाही. त्यांना युक्तीवाद करून सरळ करू शकत नाही. त्यांना परवानग्या देणं बंद करायला हवं . मग मस्ती उतरते.कोरोनाच्या काळात उतरली होती.
शांततेचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. परवानग्या देणे बंद केल्याशिवाय ही समस्या दूर होणार नाही, असे बापट यांनी सांगितले. कोरोना काळात उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजाचा त्रास जाणवत नव्हता, याचा दाखला देत त्यांनी नियमांच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुका, डीजेचा आवाज आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.