
कल्याण ग्रामीण परिसरातील खोणी-तळोजा रोडवरील एका हाय-प्रोफाइल सोसायटीमध्ये रविवारी संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याच्या आरोपावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण ग्रामीण परिसरातील खोणी-तळोजा रोडवर ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत रविवारी १० ऑगस्ट रोजी संचालक पदाच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. या निवडणुकीदरम्यान दिवसभर शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू असताना अचानक तणाव वाढला. काही उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. रूम मालकांच्या ऐवजी भाडेकरूंनी मतदान केल्याचा आरोप एका गटाने केला. यावरुन दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका दिव्यांग महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झालं. संतप्त झालेल्या जमावाने एकमेकांवर हात उचलले. यानंतर काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांवरही जमावाने हात उगारला.
याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही लोक पोलिसांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहेत. तसेच सरकारी कामात अडथळा आणत आहेत. या गोंधळात एका ग्रामपंचायत सदस्याचा पतीही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मारहाण, पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान कल्याणमधील हाय-प्रोफाइल सोसायटीमध्ये निवडणुकीदरम्यान झालेला हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सोसायटीच्या नियमांविषयी आणि निवडणुका पारदर्शकपणे होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.