त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ
डोंबिवलीत एका धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाची तयारी सुरू असताना, होणाऱ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने एका तरुणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. या मानसिक धक्क्यातून ती सावरू शकली नाही आणि अखेर तिने आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. तिच्या कुटुंबाला आणि डोंबिवलीकरांना या घटनेने मोठा धक्का बसला असून, मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असते. प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. ही स्वप्न सजवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आयुष्याची नवी इनिंग सुरू करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण कधी कधी आयुष्यात अघटीत, अवचित असं घडतं आणि स्वप्नांचा बंगला कोसळतो. डोंबिवलीतील एका तरुणीच्या आयुष्यातही असंच एक वादळ आलं. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. लग्ना आधीच होणाऱ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला अन् ती कोलमडून पडली. इतकी की तिने स्वत:चं आयुष्यच संपवलं. डोंबिवलीतील या घटनेने सर्वच हादरून गेले आहेत. प्रत्येकजण हळहळला आहे.
डोंबिवलीच्या सोनारपाड्यातील ही घटना आहे. सोनारपाड्यातील एका मुलीचं तिथल्याच एका मुलाशी लग्न जमलं होतं. घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्न होणार म्हणून ही मुलगी प्रचंड खूश होती. तिने तिच्या भावी आयुष्याची काही स्वप्नेही उराशी बाळगली होती. पण नियती निष्ठूर होईल हे तिच्या गावीही नव्हतं. 28 जून रोजी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे या मुलीवर दु:खाचा डोंगरच कोसळला.
कुणाशीच बोलेना
होणाऱ्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने ही मुलगी प्रचंड हादरून गेली. कोलमडून गेली. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्या दिवसापासून ती कुणाशीही बोलेना झाली. एकटी एकटीच राहू लागली. तिच्या कुटुंबातील प्रत्येकाने, नातेवाईकांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिला त्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तिला नॉर्मल करण्याचे असंख्य प्रयत्न केले. पण ही तरुणी गुमसुमच राहायची. ती अत्यंत कोलमडून पडली. इतकी की सोमवारी तिने राहत्या घरातच गळफास लावून आयुष्य संपवलं. त्यामुळे घरच्यांना प्रचंड धक्का बसला आहे.
शांतच राहायची
तरुणीच्या मृत्यूची बातमी कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. स्थानिक रहिवाश्यांच्या माहितीनुसार, होणाऱ्या नवऱ्याच्या निधनानंतर ही मुलगी अत्यंत शांत शांत राहत होती. पूर्वी सारखी कुणाशीही हसून बोलायची नाही. कुटुंबातील लोकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिचं दु:खं कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व व्यर्थ गेलं, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.