नंदूरबारात दुष्काळाने पपई बागांनाही फटका; पपईचे क्षेत्र पूर्ण नष्ट होण्याच्या वाटेवर
नंदूरबार येथे दुष्काळाचा फटका पपई बागांना बसला आहे, आधीच कर्जाचा डोंगर, त्यात पिकांचे नुकसान आणि उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली असल्याने, खरीप हंगामातील पिकांपाठोपाठ आता फळबागांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसू लागला आहे. पावसाअभावी शेती आणि पिकं उध्वस्त झाली असतानाच, पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोरही मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील शेतकरी राहुल राठोड यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात तब्बल चार हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. या रोपांसाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केले. यंदा रोपांच्या दरात चांगली वाढ झाल्याने उत्पादनातून आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, खतांच्या दरात वाढ झाल्याने अतिरिक्त २० हजार रुपये खर्च करून खतांची खरेदी करावी लागली.
लागवडीनंतर सहा महिन्यांत पपईचे उत्पादन सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सहा महिने उलटूनही उत्पादन न मिळाल्याने आणखी दोन महिने प्रतीक्षा केली. आठ महिने उलटूनही बागेतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पपईच्या बागेला पाणी देणेही शक्य झाले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभी केलेली पपईची बाग आता डोळ्यादेखत करपू लागली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा, तर दुसरीकडे महावितरणच्या अपुऱ्या वीजपुरवठ्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
शेतीला पाणी द्यायचे तरी कसे?
आठ तास वीजपुरवठ्याचे वेळापत्रक असतानाही पूर्णवेळ वीज मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अशा परिस्थितीत शेतीला पाणी द्यायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आता या पपईच्या बागेतून कोणतेही उत्पन्न मिळण्याची आशा नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ राहुल राठोड यांच्यावर आली आहे. मात्र, पिकावर रोटावेटर फिरवण्याचा खर्चही आता त्यांच्या डोक्यावर पडणार आहे.
आधीच कर्जाचा डोंगर, त्यात पिकांचे नुकसान आणि उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पपईच्या बागेत स्वप्नं फुलवली, दुष्काळाने सारी राख करून टाकली… फळांसोबत शेतकऱ्याची आशाही करपली, बळीराजाच्या डोळ्यांत आज वेदना दाटली… अशी विदारक परिस्थिती सध्या नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांची झाली असून, दुष्काळाने केवळ शेतीपिकेच नव्हे, तर शेतकऱ्यांची फळबागांमधून उभी केलेली स्वप्नंही उद्ध्वस्त केली आहेत.