विदर्भात दुष्काळी परिस्थिती, धानाची रोपं करपली

विदर्भात दुष्काळी परिस्थिती, धानाची रोपं करपली

नागपूर : कोकणाप्रमाणेच पूर्व विदर्भातही मोठ्याप्रमाणात धानाची  म्हणजेच भाताची लागवड केली जाते. धानाचं पीक हे इथल्या शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार आहे. पण यंदाही दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. पावसाचा खंड पडल्याने धानाच्या पऱ्यांमध्ये भेगा पडल्या, धानाची रोपं करपली आहेत. विदर्भात पावसाअभावी सध्या दुष्काळाची दाहकता पाहायला मिळत आहे.

विदर्भाच्या बऱ्याच भागात जून महिना कोरडा गेला. पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. जुलै महिन्यात तीन-चार दिवस पाऊस आला. या पावसात शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी रोपवाटिका टाकली. पण, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. आज अर्धा महिना संपायला आला तरीही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे धानाच्या रोपवाटिकाच आता करपायला लागल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील शंकर विघे हे खोपडी गावचे शेतकरी. शंकर यांच्याकडे पाच एकर धानाची शेती आहे. याच धानशेतीत रोवणी करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांचं बियाणं विकत घेतलंय, जुलैच्या पहिल्या पावसात रोपवाटिका टाकली. पण, आता पाऊस नसल्याने त्यांची संपूर्ण रोपवाटिकाच करपून गेली आहे. दुष्काळामुळे त्यांच्या डोळ्यासमोर रोवणीची वेळ निघुन जात आहे. पण पर्याय नाही. हा दुष्काळ यंदाही दारात मरण घेवून आल्याचं शंकर विघे यांनी व्यक्त केलं.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. पूर्व विदर्भात साधारण आठ लाख हेक्टर धानाचं क्षेत्र आहे. पण, यंदा दुष्काळामुळे या भागातील धान रोवणीवर मोठं संकट आलं आहे.

नागपूर जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत सरासरी 302 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी अवघा 223 मिलीमीटर पाऊस पडला. कमी दिवसांत हा पाऊस पडला. यंदा नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागात 30 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे. पावसाची हीच तूट यंदाही दुष्काळाचं सावट घेवून आली आहे. हा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरतो आहे. कारण, पावसाचा खंड पडल्याने करपलेली धानाची रोपवाटिका आणि ओस पडलेली शेती, म्हणजेच हा दुष्काळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवांचा महापूर घेवून आला आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस, आतापर्यंत 122 मिमी पावसाची नोंद

जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती

निम्मा महाराष्ट्र कोरडाच, राज्यात दुष्काळाचं सावट कायम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *