Eknath Shinde : शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच हालचाली वाढल्या, एकनाथ शिंदेंचा सर्व नेत्यांना महत्त्वाचा आदेश
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळीच एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टात आज मंगळवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हांवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी २ च्या सुमारास सुरू होईल. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात आतापर्यंत जोरदार युक्तिवाद केल्याचं बोललं जात आहे. त्यांनी सुनावणीदरम्यान विविध राजकीय पक्षांचे संदर्भ दिले आहेत. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. परंतु कोर्टातील या सुनावणीआधीच शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी सकाळीच सर्व नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
आज पुन्हा होणार सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज पुन्हा वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. कपिल सिब्बल यांनी जोरकसपणे अनेक मुद्दे मांडले आहेत. सिब्बल यांनी संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर पक्षातील घटनेत झालेले बदल देखील सांगितले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षातील मुख्यपद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु यावरून शिंदे गटातील नेते निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास करत आहेत. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होण्याआधी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे.
‘राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त आहे. त्यामुळे आपली बाजू जेव्हा मांडू, तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील. आता बातम्यांवर लक्ष देऊ नका. विभागात जोमाने काम करा, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी आमदार , खासदार, मंत्र्यांना दिला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठका वाढवा असे निर्देशही शिंदेंनी दिले आहेत. सर्व मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर शिंदेंनी सर्व मंत्र्यांची बैठक देखील बोलावली आहे. आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक होईल. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. मंत्रालयात शिंदेंच्या दालनात ही बैठक होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.