
सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. सध्या सत्ताधारी पक्षात जाण्याकडे विरोधक आमदार आणि नगरसेवक यांचा अधिक कल दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात धमाका करण्याची घोषणा केली होती. आता यावर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी नुकतंच नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला. ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. लवकरच ते शिवसेना पक्षात प्रवेश करतील. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले.
संजय राऊतांना सकाळी भोंगा वाजवण्याची सवय आहे. त्यांना काहीतरी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. पण आम्ही लवकरच धमाका करणार आहोत. आता जी काही उरलेला सुरलेला ठाकरे गट राहिला आहे आता त्या ठाकरे गटाला आम्ही दसरा मेळाव्यानंतर एक मोठा दणका देणार आहोत. त्यानंतर त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेस्तानाबूत झाला आहे, असे कृपाल तुमाने म्हणाले.
आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार आहेत. मुंबईतील ६० टक्के माजी नगरसेवक हे आमच्याकडे आलेले आहेत. त्यातील जे काही उर्वरित आहेत ते देखील आमच्या संपर्कात आहेत, तेही येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फक्त मुहुर्त काढणे बाकी आहे. आम्ही मुहुर्त काढला की त्या दिवशी ते आमच्याकडे येतील, तेव्हा संजय राऊतांना दणका मिळेल, असेही कृपाल तुमाने यांनी म्हटले.
तसेच येत्या आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती जोरदार कामगिरी करेल, असा विश्वासही कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला.
दरम्यान कृपाल तुमाने यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे आगामी दसरा मेळाव्यानंतर राज्यात काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा शिंदे गटाचा हा प्रयत्न यशस्वी होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.