मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल

माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती.

मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा...., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 9:55 PM

माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी दीपक सावंत यांचं कौतुक केलं आहे, सोबतच पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान करण्यात आली. शहरातील वायबी चव्हाण सभागृहात यानिमित्तानं कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली.

दीपक सावंत यांचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे, ते एक विश्वासू कार्यकर्ता आहेत. सोबत कोणी असेल तर मार्गदर्शन चांगलं होतं आणि अशी पदवीधर माणसं मिळतात. दीपक सावंत यांनी कोविडमध्ये जे काम केलं ते सर्वांच्या लक्षात आहे. अनेकांना माहिती नसेल मला देखील माझं शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. राज्यात सर्वसामान्य माणसांचं सरकार स्थापन झालं. दीपक सावंत यांनी आरोग्य विभागात चांगलं काम केलं, एक दूरदृष्टी असलेले डॉक्टर शिवसेनेमध्ये आहेत याचा मला अभिमान वाटतो. कोविड काळामध्ये काय होणार हे कोणालाच माहीत नव्हतं. दीपक सावंत यांनी चांगलं काम केलं असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं, तसंच मला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं होतं, तसा मी काही हलक्यात घेण्यासारखा नव्हतो.  काही हॉस्पिटल आणि डॉक्टरची टीम आहे, आपण देखील आरोग्य विभाग उभा करू शकतो. मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठं मोठी ऑपरेशन केली आहेत, कोणाचा मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा सरळ केला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.