चिन्ह जाहीर होताच शिंदे म्हणाले, परफेक्ट काम झालं… पण समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी…

शिंदे गटाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चिन्ह जाहीर होताच शिंदे म्हणाले, परफेक्ट काम झालं... पण समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी...
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2022 | 7:34 PM

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरून मोठा सामना रंगला होता. तो सामना थेट न्यायालयात (Court) देखील गेला होता. त्यानंतर तो निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दरबारी हा वाद जाऊन पोहचला होता. त्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक आयोगाने गोठवले होते. त्यानंतर नव्या नावाचे तीन आणि चिन्हाचे तीन असे पर्याय सुचविण्यास सांगितले होते. त्यावरून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर धगधगती मशाल हे चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर शिंदे गटाला देखील बाळसाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून ढाल – तलवार हे चिन्ह मिळाले आहे. त्यावर शिंदे गटाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठमोळी निशाणी, परफेक्ट काम झालं म्हणत आमची शिवसेना म्हणजे सर्वसामान्य माणसाची शिवसेना, शिवसैनिकाची शिवसेना, प्रत्येकाची शिवसेना पण समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

शिवसेना आमचीच आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच असा दावा दोन्ही गटाकडून केला जात होता. तो आता नव्या नावाने आणि चिन्हाने थांबला आहे.

मात्र, नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गटाकडून टीकेचे बाण सोडले जात असून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचे म्हंटले आहे.

तर मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काही शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते तेव्हा मशाल ही गद्दारी जाळण्यासाठी असल्याचे ठाकरेंनी म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीकेचा बाण सोडला होता.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. तर शिंदे गटाच्या ऐवजी भाजपने तिथे निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ढाल तलवार चिन्हावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असल्याचे सांगत सर्वसामान्य माणसाची आमची शिवसेना असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.