
डोंबिवलीमधील एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमाचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परप्रांतीय येऊन जर इकडे येऊन व्यवसाय करतात तर आम्हाला का रोखलं जात? असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ थेट मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचला आणि लगेचच मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगून घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता या तरुणीचा स्टॉल पुन्हा सुरू झाला आहे. मात्र या स्टॉलवरील कुक हा हिंदी भाषिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय सुरू झाला. मात्र उद्घाटनानंतर मराठी तरुणीची भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. या स्टॉलवर आता एक हिंदी भाषिक तरूण काम करणार आहे. मनसेच्या पाठिंब्यानंतर व्यवसाय सुरू झाला आहे, मात्र हिंदी भाषिक कामगारावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना एकताने म्हटले की, ‘मराठी कूक उपलब्ध आहेत का? मराठी लोक व्यवसाय शिकतात का? जर शिकत असतील तर मला लगेच दोन मराठी कूक हवेत. मराठी कूक मिळत नसतील तर काय करायचं? असं एकताने म्हटलं आहे.
निलेश गायकवाड या एकतासोबत काम करणाऱ्या तरुणाने सांगितले की, ‘मी दोन वर्षापासून ताईच्या सोबत आहे या ठिकाणी कामाला आहे. आधी दोन जण काम करायचो आता तिसरा व्यक्ती या ठिकाणी कामाला ठेवला आहे. त्याचे नाव शोएब आहे, त्याचा आज पहिला दिवस आहे. व्यवसाय सुरू झाला त्यामुळे आनंद वाटतोय. अविनाश जाधव यांनी सांगितले की टपरीवर वर लाव आणि पार्सल द्या त्यामुळे तिसऱ्या व्यक्ती कामाला ठेवला आहे. आम्ही मराठी कामगार खूप शोधले मात्र आम्हाला मराठी कूक भेटला नाही म्हणून आम्ही शोएबला कामाला ठेवलं आहे.’
एकता सावंत यांनी म्हटले की, मराठी कूक का ठेवला नाही असे विचारत असाल तर माझा प्रश्न आहे मराठी कूक आहे का मराठी लोक व्यवसाय शिकतात का? मराठी लोक व्यवसाय शिकत असेल तर मला लगेच दोन खूप पाहिजेत, मराठी लोक मला चालतील. हे हिंदी लोक थोडीशी ट्रेनिंग घेतात आणि येतात. 900 रुपये हजेरी घेतात. इतके पैसे द्यायला परवडत नाही. मला जमलं तर मी स्वतः शोरमा तयार करायला मराठी लोकांना शिकवेल. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मराठी लोकांसाठी मी करणार आहे.