
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाला. लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये रावसाहेब दानवे यांच्या कारला एका दुचाकीने जोरदार धडक दिली आहे. या अपघातानंतर दुचाकीस्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्हीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
रावसाहेब दानवे हे कामासाठी लोणावळ्यातील बाजारपेठेत आले होते. त्यावेळी एक दुचाकीने रावसाहेब दानवे यांच्या आर्टिका गाडीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर मोटारसायकल स्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
यानंतर स्थानिक रिक्षाचालकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. तसेच रावसाहेब दानवेही त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प असल्याचं दिसून आले. तसेच पोलिसांचा ससेमिरा मागे नकोय यासाठी स्थानिक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र ते स्वतःच्या दुकानापुरते ठेवले आहेत, तर पोलीस यंत्रणेने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचं निर्दशनास आले. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही पीएमपीएमएल बस चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येत होती. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोरच्या वाहनांना धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.