लग्नाचे आमीष दाखवून तीन वर्षे तरुणीचे शोषण, शिंदे गटाशी संबंधित युवा नेत्याला अटक
आरोपी शिवम दुबे याने तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून फसवलेच नाही तर , या कालावधीत त्याने पीडित तरुणीकडून लाखो रुपये आणि कार देखील बळकावल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नाचे आमीष दाखवून एका तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण करुन तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे ऊर्फ चोंग्या याला अटक केली आहे. शिवम दुबे हा शिवसेना शिंदे गटाशी संबंधित युवा नेता असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात या तरुणीकडून या दुबेने लाखो रुपये उकळले आणि कार देखील घेतली असल्याची माहिती देखली उघडकीस आली आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमीष दाखवून एका तरुणीवर सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी शिंदे गटाशी संबंधित युवा नेता शिवम दुबे उर्फ चोंग्या याला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिवम दुबे हा अंधेरी पूर्व येथील महाकाली परिसराचा रहिवासी आहे. त्याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या काळात या तरुणीकडे लाखो रुपये उकळून तिची कार देखील दुबेने बळकावल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
आणखी किती तरुणींची अशी फसवणूक केली ?
शिवम दुबे याने या तरुणीला फितवून तिला लग्नाचे आमीष दाखवले. त्यानंतर त्याने तिचा वापर केला आणि तिच्या बळावर राजकारणात उतरल्याचे म्हटले जात आहे. शिवम दुबे हा शिवसेना एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेत युवा नेता होता. त्यामुळे त्याने दहशतीने या तरुणीचे तोंड वारंवार गप्प केले. अखेर न राहवल्याने या तरुणीने धाडस एकटवून त्याच्या विरोधात केस दाखल केली आहे. शिवम दुबेने आणखी किती तरुणींची अशी फसवणूक केली आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.