
राजकारण आणि राजकारणी व्यक्ती म्हटलं की त्यांचं व्यक्तिमत्व अधोरेखित करणारं एक चौकट आहे. पण ही चौकट ओलांडून महाराष्ट्राचं राजकारण विस्तारतं आहे. वैचारिक दृष्ट्या अधिक प्रगल्भ होत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात एका अशा व्यक्तीची एन्ट्री झाली ज्यामुळे तरूणवर्गासह LGBTQ+ समुदायामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. घरात सामाजिक वातावरण असताना त्याने मात्र राजकारणात जाण्याचं स्वप्न पाहिलं अन् त्या दिशेने वाटचाल केली. आज तो राजकारणात जबाबदारीच्या पदावर आहे, आम्ही बोलतोय, अनिश गवांदेबाबत… नुकतंच अनिशच्या खांद्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी जबाबदारी दिली आहे.
अनिश गवांदे ‘गे’ अर्थात समलिंगी आहे. अनिशने ही गोष्ट जाहीरपणे सांगितली आहे. ही ओळख घेऊन तो वावरत असतो. अशातच नुकतंच अनिशवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी जबाबदारी दिली आहे. अनिशची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारे नियुक्ती होणारा अनिश हा पहिला समलिंगी तरूण आहे. त्यांच्या या निवडीला सामाजिक- राजकीय वर्तुळातून पाठिंबा मिळतोय.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यावर अनिशने त्याच्या भावना व्यक्त केल्या. आता जरी मी राजकारणात सक्रीय झालो असलो तरी या मागे 10 वर्षांची मेहनत आहे. 2014 ला मी शाळेत असल्यापासूनच मला राजकारणाची आवड होती. पण तेव्हा माझी ओळख घेऊन मी राजकारण येऊ शकत नव्हतो. कारण तेव्हा परिस्थिती तशी नव्हती. 2019 ला मी मिलिंद देवरांसोबत काम केलं. मी विचारधारेसोबत राहायचं ठरवलं. तेव्हा मी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे संधी मागितली आणि त्यांनी मला ती संधी दिली, असं अनिशने एका मुलाखतीत सांगितलं.
मी गे आहे… मी ते सर्वांसमोर खुलेपणाने मी स्विकारतो. माझी नियुक्ती झाल्यानंतर मला 200- 300 अभिनंदनाचे फोन कॉल्स आले. अनेकजण म्हणाले की तुला बघून आमच्या मनात आशा निर्माण होते. पक्षाने राष्ट्रीय प्रवक्तेपदी माझी जी निवड झाली त्यात माझं ‘गे’ असणं अडथळा नाही. तर वास्तव आहे. पक्षाने ही जबाबदारी दिल्यामुळे मी आभारी आहे. समाजासाठी आणि विशेष करून LGBTQ+ समुदायासाठी मी जे-जे करू शकेन ते-ते मला करायचं आहे, असं अनिशने सांगितलं.