परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे 12 दिवसात पाच कुटुंबियांचा मृत्यू, जळगावात डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी परिस्थिती

| Updated on: Apr 02, 2021 | 5:48 PM

जळगावच्या सावदा येथील परदेशी कुटुंबासाठी कोरोना हा जणूकाही काळच ठरला आहे (Jalgaon Corona Death).

परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे 12 दिवसात पाच कुटुंबियांचा मृत्यू, जळगावात डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी परिस्थिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

जळगाव : जळगावच्या सावदा येथील परदेशी कुटुंबासाठी कोरोना हा जणूकाही काळच ठरला आहे. या कुटुंबाने गेल्या 12 दिवसात चक्क पाच कुटुंबीय गमावले आहेत. विशेष म्हणजे परदेशी हे एकच नाही तर असे अनेक कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. पण या हाहा:काराची दखल सरकारकडून हवी तशी घेतली जाताना दिसत नाहीय. मुंबई, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये थैमान घालणारा कोरोना आता खेड्यापाड्यांमध्येही शिरला आहे. जळगाव जिल्ह्यात तर अनेक गावांमध्ये कोरोनाचा हाहा:कार माजला आहे. कोरोनाचा हा उद्रेक पाहता सरकार आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण तिथला मृत्यदरही भयानक वाढतोय. दररोज अनेक रुग्णांचा मृत्यू होतोय.

दु:खातून सावरत नाही तोच आणखी एक धक्का

सावदा येथील परदेशी कुटुंबातील नुकत्याच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांत कोरोनामुळे परदेशी कुटुंबातील चार जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर बुधवारी पुन्हा याच कुटुंबातील रामसिंग परदेशी ऊर्फ राजू परदेशी (वय 58) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

सावदामध्ये स्वर्गीय गणपतसिंह परदेशी यांचे सहा मुलांचे आणि एकूण 35 जणांचे मोठे कुटुंब आहे. त्यापैकी काही वर्षांपूर्वी दोन ज्येष्ठ बंधूंचा, एका मुलीचा तर आता कोरोनामुळे तीन भावांचा मृत्यू झाला. सहा भावंडांपैकी आता केवळ एकच भाऊ संतोषसिंग परदेशी हयात आहे. लागोपाठ आठ ते दहा दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परदेशी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करणं कठीण आहे.

जळगावातील चोपडा तालुक्यात कोरोनाचा वणवा

जळगावच्या चोपडा तालुक्यात फार भयानक अवस्था आहे. अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अनेक जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तरुणांचा देखील समावेश आहे. चोपडा पाठोपाठ धरणगाव, एरंडोल, अमळनेर, जळगाव शहर या भागांमध्ये प्रचंड बिकट अवस्था आहे. या परिस्थितीत तेथील नागरिकांना सरकार आणि प्रशासनाच्या मदतीची निंतात आवश्यकता आहे. अनेक लोक सरकारकडे आशा धरुन आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यात ज्याप्रकारे कोव्हिड सेंटर आहेत त्याच धर्तीवर तिथेही कोव्हिड सेंटर असावेत. याशिवाय तिथे बरं होण्याची हमी आणि लोकांमध्ये सरकारने तसा विश्वास निर्माण करणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल, असं तेथील स्थानिकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा : दूध, भोजन घरपोच मिळेल, पण लग्न करायचे तर कोर्ट मॅरेजच करा; जिल्हाधिकाऱ्यांचं फर्मान