
परांडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने माढा तालुक्यातील सीना नदी भागातील वाकाव, केवड, उंदरगावसह 8 ते 10 गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून गावात पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणारा माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. केळी, पेरू, चिकू, द्राक्षे, डाळींब या फळबागा तसेच सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत.

करमाळा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या भागाची पाहणी केली. या भागात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे. शुक्रवारापर्यंत सगळे पंचनामे करून शासनाकडे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.