खडाजंगी अन् शेतकऱ्यांना दम दिल्याच्या वादात धनंजय मुंडे संतापले, थेट म्हणाले, तसा अजेंडा राबवण्याचा घाट..

धनंजय मुंडे यांनी नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत मोठी विनंती केली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यात बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शाब्दिक खडाजंगी झाल्याचे सांगितले जात होते. अखेर त्यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले.

खडाजंगी अन् शेतकऱ्यांना दम दिल्याच्या वादात धनंजय मुंडे संतापले, थेट म्हणाले, तसा अजेंडा राबवण्याचा घाट..
Dhananjay Munde
| Updated on: Aug 02, 2026 | 10:18 AM

माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून ते कळकळीची विनंती करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी आपला संताप व्यक्त केला. धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, मागील दोन दिवसांपासून विशेष करून समाज माध्यमावर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झालो, वाईट वाटले. ठराविक माध्यमांना माझे कळकळीचे आवाहन आहे, कृपया कोणतेही वृत्त प्रसारित करताना शहानिशा करण्याची थोडी तसदी घ्या. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीत पार पडली, तिथे माझा आणि विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधींचा कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असतीलही मात्र सौहार्द आणि संवाद असतोच, त्याला कुणीच अपवाद नाही.

बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून याची खात्री करता आली असती, मात्र अशा प्रकारच्या बातम्या चालवून काहींना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवून टाकायचा आहे. दुसरा विषय, सुनेत्रा पवार या महिला आहेत, आधीच कौटुंबिक दुःखात आणि त्यात अजितदादांच्या माघारी प्रथमच बीड शहरात आल्या होत्या. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठमोठ्याने बोलत असल्याने सर्वांचे म्हणणे नेमके कळणार नाही.

या दृष्टीने मी आपले प्रश्न शांतपणे मांडा, हळू बोला अशी विनंती केली असता त्याचेही रुपांतर धनंजय मुंडे याने शेतकऱ्यांना दम दिला, असे केले जात आहे, याचे सध्याच्या काळात मला आश्चर्य वाटत नाही; कारण ठराविक माध्यम प्रतिनिधींनी तसा अजेंडा राबवण्याचा घाट घातलेला आहे. बीड जिल्ह्यातील 90% पेक्षा अधिक पत्रकार हे अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करतात.

त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मी कायम आदर करतो. मात्र काही पत्रकारांच्या बाबतीत आर्थिक गैरव्यवहार सहित अनेक तक्रारी माझ्याकडे पूर्वीच आलेल्या आहेत. परंतु कुणाचे तारुण्यात नुकसान नको, म्हणून मी वरिष्ठांना तक्रार करण्याऐवजी दुर्लक्ष केले. कुणाच्याही आर्थिक लाभ किंवा समृद्धीच्या आड मी येऊ इच्छित नाही.

जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सौहार्द हळूहळू स्थिर होत आहे, कृपया चुकीच्या बातम्या पेरून वातावरण बिघडवू नका, ही कळकळीची विनंती, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच खासदार बजरंग सोनवणे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात तीव्र शाब्दिक खडाजंगी झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती, तसे काही ठिकाणी वृत्त देखील प्रकाशित झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us