
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचे अपघात प्रकरण सध्या राज्यात चांगलेच गाजत आहे. गौतमीच्या कारचालकाने सामाजी मरगळे नावाच्या रिक्षाचालकाला धडक दिली होती. यात मगरळे जखमी झाले होते. याच मगरळे यांच्या मुलीच्या कुटुंबीयांनी समोर येऊन गौतमीवर अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कारमध्ये बसलेली नसतानाही नाव समोर येत असल्याने गौतमीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपघातापूर्वी चालकाने गौतमी पाटीलला नेमके काय सांगितले होते? याचाही खुलासा आता गौतमीने केला आहे. तर दुसरीकडे गौतमीच्या पत्रकार परिषदेनंतर मरगळे यांच्या मुलीने समोर येत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आम्हाला मदत करणारा गौतमीचा भाऊ नेमका कोण होता? असा सवालच मगरळे यांच्या मुलीने केला आहे.
बऱ्याच गोष्टींवरून मला ट्रोल केलं जातं. माझ्यासाठी ट्रोलिंग नवे नाही. अपघाताच्या वेळी मी गाडीमध्ये नव्हते. त्यामुळं मला ट्रोल करणं थांबवावे यासाठीच मी आज समोर आली आहे. अपघाताची घटना मसजल्यानंतर मी माझ्या भाऊ लोकांना मदतीसाठी पाठवलं होतं. पण त्या लोकांनी नकार दिला. आता सगळं कायदेशीर चालू आहे. मी तिथं जाऊन उपयोग न्हवता. समोरून कायं उत्तर येणारं हे मला माहिती होतं. त्यामुळे मी त्या ठिकाणी गेले नाही, असे स्पष्टीकरण गौतमी पाटीलने दिले.
तसेच, माझे कामं चालू होते. त्यामुळे मी मुंबईला होते. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. यापुढेही माझे पूर्ण सहकार्य राहील. पोलिसांनी कॅमेरे, मोबाईल लोकेशन सर्व चेक केले आहे. मी अपघातास्थळी असते तर जखमींकडे मी दुर्लक्ष केले नसते. आज माझं आणि माझ्यासोबतच्या कलाकारांचं पोट माझ्यावर चालतं. माझे काम बंद झाले तर याचा खूप लोकांवर परिणाम होईल. चालकाने मला फक्त मी देवाला चाललो आहे असे सांगितले. त्यापुढे मला त्याने काहीही माहिती नाही, असा खुलासाही गौतमीने केला.
त्यांनी मदतीचा हात नाकारला. आम्ही आता कायदेशीर मार्गाने पुढे जाऊ असे ते म्हणाले. त्यामुळे आता मी कायदेशीर मार्गाने चालले आहे. ते माझी बदनामी करतायत. मग मी त्यांना का भेटायला जाऊ. अपघातानंतर मी चालकाशी बोललेले नाही. चालकाचं आणि माझं अजूनपर्यंत बोलण झालेलं नाही, असेही गौतमीने स्पष्ट केले.
गौतमी पाटीलच्या पत्रकार परिषदेनंतर मरगळे यांची मुलगी अपर्णा मरगळे यांनी समोर येत गौतमीचे सर्व दावे फेटाळले आहेत. आम्ही जखमी सामाजी मरगळे यांना मदत पाठवण्यााच प्रयत्न केला, असा दावा गौतमीने केला आहे. यावरच अपर्णा मरगळे यांनी गौतमीला काही प्रश्न विचारले आहेत. क्लीनचिट मिळाल्यानंतर गौतमी पाटील वकिलांसोबत समोर आल्या आहेत. यांना माणसाच्या जिवापेक्षा आधी ठरलेले शो महत्त्वाचे वाटतात. गौतमी पाटील यांना ट्रोल केलं जात असेल तर मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. आज माझ्या वडिलांना लागलेलं आहे, आम्ही दुःखात आहोत. त्यांच्यासाठी मी आवाज उठवणार, असे अपर्णा मगरळे यांनी बोलून दाखवले आहे.
गौतमी पाटील म्हणाल्या की त्यांनी आमच्यापर्यंत मदतीसाठी गोष्टी पाठवल्या होत्या. आम्ही त्या गोष्टी नाकारल्याचेही गौतमी पाटील सांगत आहेत. पण मदत म्हणून कोणत्या गोष्टी पाठवण्यात आल्या होत्या हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. तसेच आमच्याकडे मदत घेऊन पाठवलेला गौतमी पाटील यांचा भाऊ कोण होता? याचा गौतमी पाटील यांनी खुलासा करावा, असे आव्हान अपर्णा यांनी दिले आहे.
गौतमी पाटील यांनी आमच्याप्रती सहानुभूती दाखवली असती तर आम्हीही टोकाची भूमिका घेतली नसती. त्यांची बदनामी करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. मी त्यांना अजूनही सन्मानानेच बोलते, असेही अपर्णा मरगळे यांनी सांगितले आहे.