
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, त्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती, आघाडी म्हणून लढवल्या जणार की? स्वबळाची परीक्षा होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसंदर्भात बोलताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
जागावाटपाचा निकष अद्याप ठरलेला नाही. ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, ज्या सिटिंग जागा आमच्या आहेत, त्या जागा आमच्याच आहेत, आणि हा विषय जर गुंतागुंतीचा होत असेल, तर त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यावर मार्ग निघू शकतो. मात्र आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या सर्व निवडणुका लढणार आहोत, फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्री पूर्ण लढत होऊ शकते, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
खडसेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
मी भाजपात असताना गिरीश महाजन हे माझे सामान्य कार्यकर्ते होते, असं खडसे यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बरोबर आहे मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक आहे, खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो, मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. तालुक्याचा त्यानंतर जिल्ह्याचा मग राज्याचा झालो. हे 1990 साली आले, मी शाळेत होतो, तेंव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता म्हणणार नाही, त्यांना नेताच म्हणेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे, यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठेही नाराजी नाही. काल सर्वांची बैठक झाली. मीही त्या बैठकीला होतो. सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली, कुठेही नाराजी नाही. काही कुरबुर थोडीफार असते. पक्षात पण असते आणि मित्र पक्षात पण असते. पण नाराजी माध्यमांमधून दिसते. आमच्यामध्ये एकमत आहे आणि एकमतानेच आम्ही पुढच्या सर्व निवडणुका लढवणार आहोत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.