
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, सध्या ते जेलमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
रुपालीताई चाकणकरांनी ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती मागितली त्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना ती माहिती दिली आणि त्यांनी ती जशीच्या तशी वाचून दाखवली आहे. मला वाटतं याबाबतीमध्ये आपण आता न बोललेलं बरं, पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. तपासांती खरं काय खोटं काय? ते समोर येईल. आताच आपण सर्टिफिकेट देणे योग्य नाही. जे मी ऐकलं, रुपाली चाकणकर यांनी जे सांगितलं, त्यावरून हा खूप मोठा विषय आहे. देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधार आंदोलन करण्यात आलं होतं, खडसे कुटुंबावर आरोप सुरू आहेत, यावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, असं यावेळी महाजन यांनी म्हटलं.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, रेव्ह पार्टीचा तपास पोलीस करत आहेत, आपण त्यात न बोललेलं बरं, याबाबतीत मला काही बोलायचं नाही, कुठलंही भाष्य करायचं नाही. कॅसेटमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल काय असेल पोलिसांच्या तपासात बाहेर येईल, त्यामुळे आता यावर आपण न बोललेलं बरं, असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या प्रांजल खेवलकर प्रकरणावरून जोरदार -आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.