
मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा ( अलिबाग ) रो-रो सेवेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून आता कोकणातही हायटेक रो-रो बोटीची सेवा सुरु होणार आहे. या रो-रोतून चाकरमान्यांना त्यांच्या वाहनांना देखील ठेवता येणार आहे. या M2M कंपनीची ही बोट भाऊच्या धक्क्याला येणार होती. त्यामुळे ही बोट पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झाली होती. परंतू ही बोट काही आज आली नाही. ही रो-रो कम प्रवासी बोट अत्यंत सुरक्षित असून या रो-रो बोटीची सेवा सध्या अलिबागसाठी गेली तीन वर्षे सुरु आहे.
हायटेक रो-रो बोटीसाठी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. कोकणासाठी हायटेक रो-रो बोट आज किंवा उद्या भाऊच्या धक्क्यावर दाखल होणार होती .या बोटीच्या रंगीत तालमीच्या वृत्ताने कोकणवासीयांनीही मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर मोठी गर्दी केली होती. ही बोट अलिबागच्या मांडवा येथे कोरोना लाटेनंतर सुरु झाली होती. ‘ही सेवा लवकर सुरु करावी’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रो-रो M2M कंपनीची ही हायटेक बोट एखाद्या क्रुझप्रमाणे असून तिची किंमतच ५५ कोटी इतकी आहे. या अत्याधुनिक बोटीत ५०० प्रवासी आणि १५० वाहने ठेवण्याची क्षमता आहे. बोटीचा वेग २४ नॉटिकल माईल्स इतका असून मुंबई ते मालवण अवघ्या ४ तासांत पार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने कोकणात जाण्यासाठी लागणाऱ्या १० ते १२ तासांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी वेळ लागणार आहे.
कोकणात गणपतीत जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या तिकीटांचे रिझर्व्हेशन मिळताना मारामार असते. त्याचे मुंबई ते गोवा एक्सप्रेसवेचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले असून यंदाही हा मार्ग संपूर्ण क्षमतेने चालु होईल का नाही याबाबत सांशकता आहे. त्यामुळे जर रो-रो सेवा गणपतीच्या मुहूर्तावर सुरु झाली तर प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.मुंबईहून रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग या ठिकाणी थेट सेवा अपेक्षित आहे. कोकणवासीयांमध्ये नव्या रो-रो सेवेबाबत उत्सुकता आणि समाधानाची भावना वर्तविण्यात येत आहे.