आधी अमूल आणि आता गोकुळ दूधही महागणार, सर्वसामान्यांच्या घराचं बजेट कोलमडलं
अमुल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळनेही गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. ही नवीन दरवाढ २१ मे २०२६ पासून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह कोकणात लागू होणार असून, म्हशीच्या दुधाचे दर मात्र स्थिर राहतील.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. देशातील आघाडीच्या अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) देखील आपल्या गायीच्या दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ येत्या २१ मे २०२६ पासून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये लागू केली जाणार आहे.
शनिवारी गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात प्रशासक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या दरवाढीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. गोकुळने दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ प्रामुख्याने गायीच्या दूध प्रकारांसाठी लागू असेल. यामध्ये गायीचे दूध (Cow Milk), टोण्ड दूध (Toned Milk), गोकुळ शक्ती (Gokul Shakti), स्टँडर्ड दूध (Standard Milk) या ब्रँडचा समावेश असेल. गोकुळने केवळ गायीच्या दूध प्रकारांमध्ये ही वाढ केली असून, म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे म्हशीच्या दूधाचे दर सध्या स्थिर राहतील.
दरवाढ का करण्यात आली?
गोकुळ दूध संघाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारातील वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च आणि पॅकेजिंग साहित्यासाठी लागणारा खर्च कमालीचा वाढला आहे. तसेच, तीव्र उन्हाळ्यामुळे आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे दूध संकलनात घट झाली आहे. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी दरात वाढ केली होती, मात्र त्याचा भार ग्राहकांवर टाकला नव्हता. आता मात्र खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी ही विक्री दरवाढ करणे अपरिहार्य बनले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
इतर आघाडीच्या दूध ब्रँड्सनेही किंमत वाढवली
चालू मे महिन्यात केवळ गोकुळच नाही, तर देशातील इतर आघाडीच्या दूध ब्रँड्सनी देखील किमती वाढवून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. यामध्ये अमूल (Amul) आणि मदर डेअरी (Mother Dairy) या दोन्ही मोठ्या ब्रँड्सनी १४ मे २०२६ पासून देशभरात आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ रुपयांची वाढ लागू केली आहे. ज्यामुळे अमूल गोल्ड ₹७० तर मदर डेअरी फुल क्रीम दूध ₹७२ प्रतिलिटरवर पोहोचले आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात राज्यातील चितळे, कात्रज आणि ऊर्जा यांसारख्या स्थानिक ब्रँड्सनी देखील वाढत्या उत्पादन खर्चामुळे किमती वाढवल्या होत्या. आता अमूल, मदर डेअरी आणि गोकुळच्या या लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे मासिक बजेट मात्र पूर्णपणे कोलमडले आहे.