
डोंबिवली ते ठाणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या वाहतूक कोंडीला आणि रेल्वेच्या गर्दीला पर्याय म्हणून डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्ग क्रमांक 80 अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत फक्त 20 रुपयांत ठाण्याला पोहोचता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दर तासाला ही बस धावणार आहे. या बसचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी बोलताना चव्हाण यांनी, ‘या बसचे उद्घाटन आणि भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा योग एकाच दिवशी आल्याने काही लोकांना गुदगुल्या होतील अशी टीका विरोधकांवर केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दररोज अनेक प्रवासी डोंबिवलीतून ठाण्याला जात असतात. मात्र लोकलच्या गर्दीमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता डोंबिवलीकरांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करण्यासाठी KDMT कडून मार्ग 82 ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी मार्गे ठाण्यापर्यंत धावणारी ही बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत दर तासाला एक फेरी असून तिकीट फक्त 20 रुपये असणार आहे. ही बस माजीवडा येथे थांबा घेणार असल्यामुळे मेट्रो आणि इतर वाहतूक सुविधांशी थेट जोडणी मिळणार आहे. या बसमुळे बोरिवली, नवी मुंबई तसेच मेट्रोमार्गे पुढील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी ठाण्यातील माजिवाडा ते ठाणे स्टेशनपर्यंत 30 रुपये खर्च करून प्रवास करावा लागत होता. मात्र आता डोंबिवलीहून थेट माजिवाड्यापर्यंत अवघ्या 20 रुपयांत प्रवास शक्य होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
या बस सेवेचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि परिवहन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा आणि बस उद्घाटनाचा योग एकाच वेळी आल्याने विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. असे असताना रवींद्र चव्हाण यांनी या बस सेवेमुळे काही लोकांना गुदगुल्या होतील असा टोला विरोधकांना लगावला आहे. दरम्यान, सुरक्षित, किफायतशीर आणि वेळेवर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने डोंबिवलीकरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.