चैत्यभूमीबाबत सरकारचा मोठा निर्णय! हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी दरवेळी परवानगीची गरज नाही, कायमस्वरुपी…

14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा कायमस्वरूपी शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे.

चैत्यभूमीबाबत सरकारचा मोठा निर्णय! हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी दरवेळी परवानगीची गरज नाही, कायमस्वरुपी...
dadar chaityabhumi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 6:51 PM

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : येत्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. म्हणूनच हे ठिकाण समस्त भारतवासीयांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे. महापरिनिर्वाण दिनाला दरवर्षी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करतात. या दिवशी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 एप्रिल रोजी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाते. प्रत्येक वेळी पुष्पवृष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागायची. हीच परवानगी वारंवार घ्यावी लागू नये यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शासन निर्णयदेखील जारी करण्यात आलाय.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

सरकारने 14 एप्रिल व 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा कायमस्वरूपी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. पुष्पवृष्टी करण्यासाठी दरवेळी शासनाची परवानगी घ्यावी लागत होती, ती आता घेण्याची गरज पडणार नाही.

Loading...

दादर मेट्रो स्टेशनचे नाव चैत्यभूमी

या निर्णयाचे आंबेडकरी अनुयायांनी स्वागत केले आहे. दुसरीकडे सरकारकडून दादर मेट्रो स्टेशनचे नावदेखील चैत्यभूमी केले जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही येत्या हिवाळी अधिवेशनात केली जाणार आहे. आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दादर मेट्रो स्थानकाचे नाव हे चैत्यभूमी केले जाईल. याआधी दादर रेल्वेस्थानकाचे नाव चैत्यभूमी केले जाईल, असे सांगितले जात होते. परंतु चुकीचे माहिती प्रसिद्ध झाल्याने हा गोंधळ उडाला होता. सरकारने नंतर दादर रेल्वे स्टेशनचे नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाचे नाव चैत्यभूमी केले जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 डिसेंबर रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी येथे जमा होणार आहेत. या सर्व अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुंबई पालिकेकडून चोख तयारी केली जात आहे. पाणी, स्वच्छतागृहे यांची व्यवस्था केली जात आहे. प्रशासनही सज्ज असेल अशी ग्वाही पालिकेने दिलीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us