Chandrapur News: अस्वल आणि तिच्या पिलाच्या मृत्यूचा तपास सुरू होता, पण शेतकऱ्याच्या शेतात सापडलं वाघाच्या शिकारीचं दीड वर्षांपूर्वीचं धक्कादायक रहस्य!
Bear Death Probe Uncovers Farmer Shocking Tiger Poaching Secret: अस्वल आणि तिच्या पिलाच्या मृत्यूच्या तपासात वाघाच्या शिकारीचा पर्दाफाश झाला आहे. चंद्रपूरमध्ये शेतकऱ्याचा धक्कादायक कारनामा उघड झाला आहे.

शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडून वन्यप्राण्यांची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. चिमूर तालुक्यात अस्वल आणि तिच्या पिलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास करताना वनविभागाने तब्बल दीड वर्षांपूर्वी झालेल्या वाघाच्या शिकारीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कवडशी गावात तारेच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहामुळे अस्वल आणि तिच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी वनविभागाच्या पथकाने तपास सुरू केला. याच तपासादरम्यान वनाधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्याने यापूर्वीही अशाच पद्धतीने वाघाची शिकार केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वनपथकाने सखोल चौकशी करत या जुन्या शिकार प्रकरणाचा छडा लावला.
गट क्रमांक 10, मौजा बोरगाव रोडी रिठ परिसरातील शेतात संबंधित शेतकऱ्याने सुमारे एक ते दीड वर्षांपूर्वी तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडून वाघाची शिकार केली होती. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर शेतात खड्डा खणून पुरण्यात आले. तर वाघाची नखे, दात आणि हाडे विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरी लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी आणि चिमूर या दोन वनपरिक्षेत्रांतील वनपथकांनी संयुक्तपणे कारवाई केली.
कसून चौकशी आणि तपासानंतर वाघाच्या शिकारीचा हा प्रकार उघडकीस आला. वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांची साठवणूक केल्याची बाबही समोर आल्याने वनविभागाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. संबंधित शेतकऱ्याला 27 नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
या भागात शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्याच्या नावाखाली तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अस्वल आणि तिच्या पिलाच्या मृत्यूच्या तपासातून दीड वर्षांपूर्वीच्या वाघाच्या शिकारीचा उलगडा झाल्याने वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ब्रह्मपुरी वनविभागाकडून सुरू आहे.
