
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आलंय. या प्रकरणात प्रांजक खेवलकर यांच्यासह सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान खडसे यांच्या जावायला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून न्यायालयाची आणि कायदा यावर भाष्य केलंय.
मी याआधी रेव्ह पार्टीसारख्या गोष्टींचे समर्थन करताना कोणालाही पाहिले नव्हते. ज्या प्रकारे त्यावर चर्चा शुरु आहे ते विदारक आहे. खासकरून सुषमा अंधारे आणि विद्या चव्हाण या नेत्या पुण्यात घडलेला प्रकार रेव्ह पार्टी नव्हती फक्त पार्टी होती, असं सांगत आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र अशा गोष्टीत पकडल्या गेलेल्याचे समर्थन करणे हा दळभद्रीपणा आहे. असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही, असी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तसेच ही कोणती नीतिमत्ता आहे? हे कोणत्या पद्धतीचा समर्थन आहे? असे थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
पुढे बोलताना त्यांनी रेव्ह पार्टी प्रकरणाचा तपास आणि न्यायालयाचा वचक यावरही भाष्य केलंय. खडसे असले किंवा कोणीही तरी असे प्रकार करायचा कोणाला परवाना मिळतो का? काहीही केलं तरी अटक होणार नाही, अशी कोणाला मुभा मिळते का? असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. सध्याचे युग एवढे पुढे गेले आहे कोणताही मंत्री कोणत्या पोलिसांना काही चुकीचं सांगत नसतो. विशेष म्हणजे अशा गोष्टींवर न्यायालयाचा किंवा अनेक यंत्रणांचा वॉच असतो. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमुळे सर्वकाही उघडं पडतं, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
पुढे बोलताना सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केलं. दोघे एकत्र आल्याने काय फरक पडणार आहे ? तुमच्या डोक्यातले लोकांच्या बाबतीतले विचार जनता विसरणार आहे का? साधू संत,गंगा मैया आणि तुमचे भाषिक वाद करणारे विचार हे लोकांच्या डोक्यातून जाणार आहेत का ? आज लोकांचा विचार एका उंचीवर गेलेले आहेत. लोक हुशार झालेले आहेत. या दोघांचाही राजकारणात ठणठण गोपाळा झालेला आहे, अशी खरमरीत टीका गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.