
सध्या नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे, कुंभमेळ्यासाठी 1700 झाडं तोडावी लागतील अशी नोटीस महापालिकेनं काढली आहे. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. या चळवळीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील पाठिंबा दिला आहे, तसेच या वृक्षतोडीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती, दरम्यान त्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, या भेटीवरून ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
‘हमको पता था, सयाजी शिंदे यांची दौड समजली आहे. ही राजकीय भूमिका होती. राज ठाकरे यांच्या नाटकात सयाजी शिंदे कलाकार आहेत. सयाजी शिंदे यांनी लक्षात ठेवावं राज ठाकरे यांच्या घरी चहापान काढलं जातं आणि ही संस्कृती बनली आहे, पण ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. तुमचही चहापान कधी तरी काढले जाईल. सयाजी उलटे पडले आहेत, सयाजी यांचं नाटक समोर आलं आहे. मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील चहापाणी कधीकाळी काढण्यात आलं होतं. मला तुम्हाला सांगायचं आहे, की कधी ना कधी तुमचं चहापाणी देखील काढलं जाणार. माझ्या ट्विटमध्ये जो फोटो दाखवला आहे त्यामध्ये एक कप दाखवलेला आहे चहाचा, हे कधी ना कधीतरी काढलं जाईल याच्यात मला शंका नाही. परंतु आज सयाजी शिंदे यांचं पितळ उघडं पडलं आहे,’ अशी टीका यावेळी सदावर्ते यांनी केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काही जण राजकारणाने प्रेरित होऊन रिप्लांटेशनला वृक्षतोड म्हणत आहेत. जसं काँग्रेस म्हणत होतं संविधान खतरे मे हे, तसंच हे सर्व आहे. मात्र आता सयाजी शिंदे यांचं पितळ उघडलं पडलं आहे, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.