एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण… गुणरत्न सदावर्ते यांची थेट मागणी; लाड-जरांगे भेटीवरही हल्ला
गुणरत्न सदावर्ते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले आहे. एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी त्यांची मागणी आहे. आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंचे लाड करण्यात येत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. जरांगे, लाड आणि उदय सामंत यांच्यावर टीका करतानाच सदावर्ते यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरही जोरदार भाष्य केलं आहे. आक्रमक होत सदावर्ते यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न रेटले आहेत. त्यामुळे सरकार त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले. कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करतानाच एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना पैसे द्या, अशी थेट मागणीच गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टानेही लाडकी बहीणसारख्या योजनेवर टिपण्णी केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आपण जातीयवादी झालो
यावेळी त्यांनी प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवरही हल्ला चढवला आहे. संविधान जेव्हा जेव्हा अडचणीत येते, तेव्हा तेव्हा संविधानाचा एक विद्यार्थी म्हणून, एक सामन्य नागरिक म्हणून मी पुढे आलो आहे. मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आपण अधिक जातीयवादी होत चाललो आहोत. आमचे मित्र उदय सांमत जरांगेला भेटायला गेले. त्या बैठकीत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला की त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजतात, असा हल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी चढवला.
पॉलिटिकली अडकले
उदय सामंत ब्राम्हण म्हणून डिस्कार्ड झाले आणि प्रसाद लाड मराठा होते म्हणून गेले. उदय सांमत म्हणाले की, त्यांच्या भूमिकेत आता प्रसाद लाड गेले आहेत. प्रसाद लाड म्हणतायेत की, मी एक मराठा म्हणून जरांगेना भेटायला आलो. उदय सामंत पॉलिटिकली अडकले आहेत. उदय सामंतांना जरांगेंचे खुट्टे बसले आहेत, असं सदावर्ते म्हणाले.
जातीसाठी माती खाल्ली
आमच्या प्रसाद लाड यांनी जरांगेचा लाड केला. माय बहीणीवर शिव्या दिल्यानंतर जातीसाठी माती खाल्ली म्हणून पावशेरी व्यक्तीकडे जात असतील तर योग्य नाही. जरांगेंच्या मागण्या संविधानाशी संबधित नाही. जरांगे फटफटफट कास्ट व्हॅलिडीटी द्या म्हणत आहे, असंही ते म्हणाले.