Rain Update: कोकण, मुंबईत मुसळधार बरसणार, ठाण्यात ऑरेंज अलर्ट

Weather Today : राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Rain Update: कोकण, मुंबईत मुसळधार बरसणार, ठाण्यात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
| Updated on: Jul 04, 2025 | 7:40 AM

Maharashtra Rain Alert: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु आता राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात जून महिन्याच्या सुरुवातील पावसाने ओढ दिला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात पावसाची तूट असताना जुलै महिन्यात पाऊस सक्रीय झाला आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पुणे घाटमाथ्यावर पावसामुळे रस्ते बंद

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार सुरु आहे. या पावसामुळे ताम्हिणी घाट परिसरातील काही रस्ते बंद झाले आहेत. काही ठिकाणी दरडी पडण्याचे प्रकार घडले आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर मुसळधार पडलेल्या पावसामुळे फेसाळलेल्या धबधब्यांनी रोद्ररूप धारण केले आहे. रस्ते पुलावरून पाणी वाहू लागल्याने परिसरातील काही रस्त बंद झाले आहेत. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणी वेगाने वाढत आहे. कृष्णा कन्हेर, राधानगरी या धरणांत आवक वाढल्यामुळे विसर्ग सुरु केला आहे. यामुळे वेणा, भोगवती नदी दुथळी भरून वाहत आहेत.

चार दिवस पाऊस सक्रीय असणार

राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे.

खडकवासला धरण साखळीत १७.१५ टीएमसी पाणीसाठा

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये आवक वाढली आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण १७.१५ टीएमसी म्हणजे ५८.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी या दिवशी साठा फक्त ४.८५ टीएमसी म्हणजे १६.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

असा आहे जलसाठा

  • खडकवासला १.१६ टीएमसी
  • पानशेत ६.०९ टीएमसी
  • वरसगाव ८.१३टीएमसी
  • टेमघर १.७६ टीएमसी