HSRP : HSRP नसलेल्या वाहनधारकांची आता खैर नाही ! परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट न लावल्यास परिवहन विभाग आता कठोर कारवाई करणार आहे. लाखो वाहनांवर अजूनही HSRP नसल्याने विशेष पथके तपासणी करतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागेल. वाहन चोरी रोखण्यासाठी HSRP आवश्यक असल्याने, कारवाई टाळण्यासाठी त्वरित ही प्लेट बसवून घ्या.

HSRP : HSRP नसलेल्या वाहनधारकांची आता खैर नाही ! परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 13, 2026 | 10:55 AM

राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या वारंवार दिलेल्या मुदतीनंतरही अनेक वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागाने (Transport Department) कठोर पाऊल उचलण्याची तयारी केली असून, ही नंबरप्लेट ज्या वाहनांवर नसेल त्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष पथकंही तैनात करण्यात आली आहेत.  परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 लाख 8 हजार वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मोठ्या संख्येने असे काही चालक आहे, ज्यांनी आपल्या वहानंवर अजूनही ही HSRP प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता त्यांना मोठा दणका बसणार असून कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

विशेष पथकांकडून वाहनांची तपासणी

HSRP साठी नोंदणी न केलेले किंवा अद्याप जुन्या अथवा अनधिकृत नंबर प्लेटचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवर परिवहन विभागाची विशेष पथके लक्ष ठेवणार आहेत. शहरांसह विविध प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

HSRP नंबर प्लेट का महत्त्वाची आहे ?

HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त अॅल्युमिनियमची नंबर प्लेट असून ती वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस बसवली जाते. या प्लेटवर निळ्या रंगाचा क्रोमियम-आधारित अशोकचक्राचा होलोग्राम, विशिष्ट क्रमांक आणि लॉकिंग यंत्रणा असते. HSRP सोबत वाहनाच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची माहिती असलेला स्टिकरही दिला जातो. त्यामुळे वाहनाची ओळख पटवणे आणि त्याची माहिती तपासणे अधिक सुलभ होते.

चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठीही उपयोग

HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख आणि त्यांचा मागोवा घेणे तुलनेने सोपे होते. नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर संबंधित वाहनाची नोंदणी आणि आवश्यक माहिती मिळवणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे वाहन चोरी तसेच चोरीच्या वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग होतो.  त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांनी अधिकृत प्रक्रियेद्वारे ती बसवून घेणे आवश्यक आहे. परिवहन विभागाकडून तपासणी आणि कारवाईला सुरुवात झाल्यास HSRP नसलेल्या वाहनधारकांच्या अडचणी वाढू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us