महायुतीचा धर्म या निवडणुकीत पाळला गेला नाही, मंत्री जयकुमार गोरे यांचा आरोप
जिल्हा बँकेत स्वतंत्र लढलो असतो तर काय निकाल लागला असता ? हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीमधील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, असा गंभीर आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या सूचना पाळल्या गेल्या नसल्याची नाराजी व्यक्त करतानाच, भाजपने स्वतंत्रपणे आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता, असा दावाही त्यांनी केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील राजकीय धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. महायुतीचा धर्म या निवडणुकीत पाळला गेला नाही, असा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. महायुतीमधील कोणत्याही नेत्यावर आपल्याला टीका करायची नसल्याचे स्पष्ट करत, वरिष्ठ नेतृत्वाने ज्या सूचना दिल्या होत्या, त्यांचे पालन झाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांचा मला अभिमान असल्याचे सांगत, भाजप म्हणून आपण मोठ्या ताकदीने निवडणूक लढल्याचेही गोरे म्हणाले.
खंडाळा मतदारसंघात अवघ्या चार मतांचा, फलटणमध्ये पाच मतांचा, तर कोरेगावमध्ये शून्य मतांचा फरक राहिला.पाटणमध्ये सत्यजित पाटणकर यांनी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवली. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आणि तिथेही अवघ्या सहा मतांचा फरक राहिला, असे त्यांनी सांगितले. महायुतीमधीलच काही घटक पक्ष अर्जुन काळे यांच्या विरोधात असतानाही ती निवडणूक आपण जिंकली, असा दाखला देत कॅटेगरीमधील पाचही जागा भाजपने लढवल्या असत्या तर त्या जिंकल्या असत्या, असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला.