IMD Weather Update : पुढचे 36 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर आता नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

IMD Weather Update : पुढचे 36 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर आता नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
| Updated on: May 22, 2025 | 7:05 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे,  ते येत्या 36 तासांमध्ये  अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे कूच करणार आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा  रेड अलर्ट दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो,  तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी पुढील दोन ते चार दिवस गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनापट्टीवर मासेमारी करायला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

रायगडला पावसानं झोडपलं

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरु असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याच प्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही आपली नावं किनाऱ्यावर आणली आहे.