Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिवच्या राजकारणात ठाकरेंना मोठा धक्का, अपेक्षा होती तेच घडलं

Dharashiv Politics : दोन महिन्यांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हापासून धाराशिव जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.

Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिवच्या राजकारणात ठाकरेंना मोठा धक्का, अपेक्षा होती तेच घडलं
omraje nimbalkar- uddhav Thackeray
| Updated on: Aug 27, 2026 | 7:50 AM

दोन महिन्यांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हापासून धाराशिव जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. पण ओमराजे निंबाळकर गेल्यापासून उद्धव ठाकरे शिवसेनेत पडझड सुरु झाली आहे. धाराशिव नगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सात नगरसेवक आहेत. त्यातल्या चार नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर अशी या चार नगरसेवकांची नावं आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

ओमराजे निंबाळकर सोडून गेले तरी पक्षाला खिंडार पडणार नाही असा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून दावा करण्यात येत होता. पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एक-एक करुन साथ सोडू लागले आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी विकासाच्या मुद्यावरुन ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे जे सहाखासदार फुटले, त्यात सर्वाधिक चर्चा ओमराजे निंबाळकरांच्या जाण्याची झाली.

त्या वादळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली

ओमराजे निंबाळकर हे तळागाळात जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची भक्कम पकड आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2022 साली शिवसेना फुटली, त्या वादळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांना भक्कम साथ दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकले सुद्धा. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी वेगळी वाट धरली. परिस्थिती, प्रवाहानुसार त्यांनी निर्णय घेतला. म्हणून त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येमध्ये फरक पडला. त्याला अनफॉलो करण्याचं प्रमाण वाढलं.

Follow Us