ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

| Updated on: Oct 26, 2021 | 11:55 AM

येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने महापालिकेत नोकर भरतीचा बार उडवून दिला आहे. सोबतच आयटी हब आणि लॉजिसस्टिक पार्कसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर
नाशिक महापालिका.
Follow us on

नाशिकः येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने महापालिकेत नोकर भरतीचा बार उडवून दिला आहे. सोबतच आयटी हब आणि लॉजिसस्टिक पार्कसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

महापालिकेची शुक्रवारी महासभा आहे. सत्ताधारी भाजपकडे अजूनही दोन-तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. ते पाहता याचा फायदा घेण्यासाठी भाजपने पुरता जोर लावला असून, निवडणुकीच्या तोंडावर जंबो नोकर भरती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत ठेवला आहे. सोबतच महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवरच आयटी हब साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी महापौरांनी दिंडोरी येथील जागेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याबाबतच्या अडचणी पाहता आता शहरातीलच एका महापालिकेच्या जागेवर आयटी हब उभारण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री गडकरींची कल्पना

नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी जागा देण्याचे आवाहन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यानंतर आडगावर शिवारात महापालिकेच्या दोन जागा शोधण्यात आल्या आहेत. त्या जागा लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात येणार आहेत. यालाही महासभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सोबतच सध्या महापालिकेत अनेक रिक्तपदे आहेत. त्यामुळे अनेक कामकाजात अडथळे निर्माण होत आहे. हे पाहता रोजंदारीवर काही पदे भरण्याचा विचार सुरू आहे.

महापौरांचा दुजोरा

नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी जागा देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले होते. त्यानुसार आम्ही जागा शोधल्या आहेत. महापालिकेची शुक्रवारी सभा होणार असून, या सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिवाय नोकर भरती करण्याचा विचारही सुरू आहे. त्यालाही या सभेत मंजुरी मिळेल, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

रणसंग्राम रंगणार

नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येत आहे.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3

सध्याचे प्रभाग

29 प्रभाग 4 सदस्यीय
2 प्रभाग 3 सदस्यीय

अशी राहील नवी प्रभाग रचना

40 प्रभाग 3 सदस्यीय
1 प्रभाग 2 सदस्यीय

इतर बातम्याः

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ; निधी येऊनही अतिरिक्त 29 कोटींची मागणी, चौकशीचे लचांड

‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार