मुंबईतील शीव, विद्याविहार आणि गोरेगाव – मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे उद्या उद्घाटन
शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवरील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने या तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई महानगराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव – मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता दृकश्राव्य (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संबंधित उड्डाणपुलांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
शीव रेल्वे स्थानक रेल्वे उड्डाणपूल
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP – 2) अंतर्गत मध्य रेल्वे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका (५ वी आणि ६वी) टाकण्याचे नियोजित आहे. या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शीव स्थानकाजवळच्या रेल्वेवरील पुलाची पुनर्बांधणी काम रेल्वेच्या आवश्यकतेनुसार हाती घेण्यात आले. तसेच, ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित ठरविण्यात आल्याने पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले होते.
रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण आणि मजबूतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आले आहे.
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा उड्डाणपुल
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळांवरून जाणारा उड्डाणपूल महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने उभारण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होणार असून घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतूकही कमी होणार आहे.
गोरेगाव – मुलुंड जोड मार्गवरील (GMLR) उड्डाणपूल
मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पूर्व द्रुतगती महामार्गाची पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणी करून पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानची वाहतूक अधिक सुलभ आणि सुरळीत करणे हा आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेलजवळील जंक्शनवर १.२६ किलोमीटर लांबीचा ३ × ३ मार्गिकेचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. गोरेगाव (पूर्व) येथील, जनरल अरुणकुमार वैदय मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोष नगर पर्यंतच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
या उड्डाणपुलामुळे, गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्यांतर्गत जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान जोडणी तसेच जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन, वालभट नदी चौक तसेच लगतच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची भौमितिक रचना, अभियांत्रिकी नियोजन आणि बांधकाम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.