Maharashtra Weather Updates : ऐन थंडीत पुन्हा पावसाचं संकट ? महाराष्ट्रात पुन्हा बरसणार सरी, येत्या 24 तासांत..

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. प्रजासत्ताक दिनी राज्यात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम चक्रावातामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात हवामान बदलेल. यामुळे थंडी परत येण्याची शक्यता असून, काही ठिकाणी धुक्याचीही शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Weather Updates : ऐन थंडीत पुन्हा पावसाचं संकट ? महाराष्ट्रात पुन्हा बरसणार सरी, येत्या 24 तासांत..
कसं असेल राज्यातील हवामान ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 26, 2026 | 8:06 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा घामाच्या धारा वहायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीसाठी काढलेले स्वेटर्स, गरम कपडे आता आत ठेवायचे की नाही हाच प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. थंडी कमी-अधिक होताना दिसत आहे. धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. मात्र आज, प्रजासत्ताक दिनी हवामान कसं असेल याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे.

महाराष्ट्रात आज ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे. ऐन थंडीत पावसाच्या सरी अनुभवयाला मिळू शकतात, त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होऊन थंडी वाढूही शकते. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावातामुळे राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसू शकतो. विदर्भात हवामान निरभ्र राहील तर नागपूरमध्ये सकाळी सौम्य गारवा जाणवू शकतो. मात्र दुपारी तापमान वाढून घामाच्या संरीनी नागरिक चिंब होऊ शकतात.

उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे उत्तर व मध्य भारतात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. आजपासून दोन दिवस मध्य महाराष्ट्रात ढगाळ आकाश असू शकतं. काही ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपात धुके पसरू शकतं, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहील. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता असून, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं असू शकेल.

जानेवारी संपत आला तसा राज्यातील थंडीचा जोरही कमी होताना दिसत आहे. मात्र अवकाळी पाऊस आल्यास वातावरण पुन्हा बदलू शकतं. नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट देण्यात आला आहे.