
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून पूरस्थिती निर्माण झालीये. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय. मुंबई, ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. यासोबतच आज जालनामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता. सात वाजून गेल्यानंतरही ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाकडून सांगितले जातंय.
पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुटा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय. मुठा नदी पात्राच्या शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.
रेड अलर्टमुळे कल्याण-डोंबिवलीत महापालिकेची यंत्रणा रात्रीपासूनच ऑन अलर्ट’ मोड वर आहे. मुसळधार पावसाचा धोका त्याच बरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता; यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा 24 तास यंत्रणा सज्ज आहे. रात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू. रात्रीपासून स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करत, सखल भागात सक्षम पंप आणि NDRF टीम्स तैनात; गरज असेल तरच बाहेर पडा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा: KDMC कडून नागरिकांना आवाहन केले जातंय.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अतिमुसळधार पावसाने झोडपले आहे. पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगम स्थानावर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीला महापूर. अभयारण्यात नदीला मोठा पूर आल्याने चंडिका देवीचे पुरातन मंदिर तात्पुरता दर्शनासाठी बंद करण्यात आलंय. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितुर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील डोंगरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने तेरणा नदीला पूर आलाय. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा, तेरणाकडेच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लघु मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असणारा जुई मध्यम प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाला असून मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे.
अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट- वागदरी वाहतूक बंद. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 6864 क्युसेक विसर्ग वाढवून पहाटे 3.00 वा 10043 क्यूसेक करण्यात आलाय, असे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.